नवी मुंबई : ऐरोली येथील राड्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेवक पितापुत्रासह सात जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. राजकीय श्रेयवादातून शिवसेना व राष्टÑवादीत हा वाद उफाळून आला होता.पालिकेतर्फे ऐरोलीत उभारण्यात आलेल्या वास्तूच्या उद्घाटनावेळी घडलेल्या राडाप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मनोहर मढवी व नगरसेवक करण मढवी यांना रबाळे पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्यांच्या इतर पाच साथीदारांनाही अटक करण्यात आली असून, या राड्याप्रकरणी अद्यापपर्यंत १२ जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी पालिकेच्या वास्तूचे उद्घाटन सुरू असताना, हा प्रकार घडला होता. शिवसेनेचे नगरसेवक मनोहर मढवी यांच्या प्रभागात ही वास्तू असल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा, अशी त्यांची अपेक्षा होती; परंतु पालकमंत्री अथवा खासदार वेळेवर उपस्थित न राहू शकल्याने महापौर जयवंत सुतार व राष्टÑवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन उरकण्यात आले. यावरून नगरसेवक मनोहर मढवी यांचा महापौर व आमदार यांच्यासोबत वाद झाला असता, त्यातून हाणामारी झाली होती. या दरम्यान, आमदार संदीप नाईक हे गाडीत बसत असताना, त्यांच्यावर कैचीने तसेच रॉडने हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये नाईक यांच्या सोबतचे दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्या गाडीचीही काच फोडण्यात आली. या राड्याप्रकरणी दोन्ही गटांविरोधात रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात भाजपाचे युवा नेते यांनीही घटनास्थळी जाऊन नगरसेवक मढवी यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.
राड्याप्रकरणी नगरसेवक पितापुत्रास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 11:57 PM