प्रज्ञा म्हात्रे / ठाणे अमिताभपाठोपाठ आमीर खानचीही तारीख मिळत नसल्याने कैद्यांच्या मनोरंजनासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाने तयार केलेल्या रेडिओ स्टेशनचे म्हणजेच टीसीपीचे उद््घाटन खोळंबले आहे. अजूनही कारागृह प्रशासन नव्या सेलिब्रिटीच्या प्रतीक्षेत असल्याने या रेडिओ स्टेशनच्या उद््घाटनाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांचे ज्ञानाबरोबर मनोरंजन व्हावे, त्यांचा वेळ चांगला जावा; तसेच त्यांना चांगली गाणी ऐकायला मिळावी या उद्देशाने कारागृह प्रशासनाने रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपी तयार केले. त्यासाठी सुसज्ज अशी रुमही तयार केली. कैद्यांच्या आवडीची हिंदी-मराठी गीते तसेच बंद्यांचे भजन, प्रवचन यांसारखे विविध कार्यक्रम या टीसीपीद्वारे प्रसारित केले जाणार आहेत. या रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणून बंदीच काम करणार आहेत. यासाठी निवडक पाच ते सहा बंदींना आरजेसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असून एफ एमप्रमाणेच या टीसीपीचे कार्य चालेल. काही कालावधीनंतर ठाणे जिल्ह्यात याचे केंद्र उभारण्याचाही कारागृह प्रशासनाचा मानस आहे. अनेक महिन्यांपासून हे टीसीपी सुरू होणार अशी चर्चा असताना उद्घाटनालाच मुहूर्त मिळालेला नाही.
कारागृहातील रेडिओला सिग्नल मिळेना!
By admin | Published: November 18, 2016 3:04 AM