राहुल गेठे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत; उपायुक्तपदी नियुक्ती
By नारायण जाधव | Published: August 28, 2023 03:40 PM2023-08-28T15:40:26+5:302023-08-28T15:40:42+5:30
नगरविकास विभागाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यअधिकारी डॉ. राहुल गेठे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर सोमवारी पुन्हा उपायुक्तपदी कायमस्वरूपी तत्काळ नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते महापालिकेत उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर आले होते.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने प्रशासकीय ठराव करून २ मे २०२३ रोजी त्यांना महापालिका सेवेत कायम समावेश करण्यास मान्यता दिली होती. महापालिकेच्या विनंतीनुसार नगरविकास विभागाने सोमवारी तत्काळ प्रभावाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
राहुल गेठे हे शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदावर कार्यरत असले तरी सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यअधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे ते जवळचे मित्र आहेत. यापूर्वीही गेठे यांनी नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्तपदाचा कारभार पाहिला आहे. मात्र, आता त्यांच्या कायम समावेशनाचे आदेश नगरविकास विभागाने सोमवारी काढले आहेत. महापालिकेत उपायुक्तांची ११ पदे मंजूर असून, यापैकी शासन कोट्यातील ५ पदांवर प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची मान्यता आहे. या प्रतिनियुक्त कोट्यातील एका पदाचे आता महापालिकेत कायमस्वरूपी समावेशन केले आहे.