नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमध्ये खाद्यपदार्थांचे पॅकींग व साठवणूक करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. कंपनीमध्ये नामांकित कंपन्याचे खाद्यपदार्थ व शीतपेय साठवण्यात आले होते. बॅचवरील दिनांकामध्ये बदल केला जात असल्याचे निदर्शनास आले. कंपनीमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून आतमधील २४२६२ किलो खाद्यपदार्थ, ७३३८० किलो शितपेये असा २४ लाख ५२ हजार रुपये किमतीचे साहित्य सील करण्यात आले आहे.
ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये तुर्भेमधील कंपनीवर शुक्रवारी रात्री अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे टीमने छापा टाकला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी याविषयी तक्रार केली होती. कंपनीमध्ये नामांकित कंपन्यांचे खाद्यपदार्थांवरील जुने लेबल पुसून नवीन लेबल लावून त्यांची न्यूझीलंड, ऑस्ट्रेलीया, युएस, कॅनडा व इतर देशांमध्ये निर्यात केली जाणार असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
धाड टाकली तेव्हा बेस्ट, बिफोरची दिनांक शाहीने पुसून नवीन टाकली जात असल्याचे निदर्शनास आले. निर्यात करण्याविषयीची कागदपत्र आढळली नाहीत. संबंधीतांकडे साठा परवानाही आढळला नाही. काम करणारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती. कंपनीत पेस्ट कंट्रोल केले नसल्याचे आढळले. या ठिकाणी अन्न पदार्थांचा रिलेबलींग करून विक्रीसाठी साठा केल्याचे आढळले. नियमाप्रमाणे आवश्यक परवाने घेतलेले नाहीत. यामुळे ग्राहकांची दिशाभून करून अन्न व सुरक्षा नियमांमधील तरतुदींचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने राजगीरा चिक्की, लाडू, मुरमुरा लाडू, बटाटा चीप्स, पोहा, पापड असा २४२६२ किलो वजनाचा साठा आढळून आला. ७३३८० लिटर शितपेय आढळून आली. या सर्व खाद्यपदार्थ व शितपेयांची किम्मत २४ लाख ५२ हजार एवढी आहे. हा साठा सील केला असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी बी सी वसावे, पी एस पवार, एस एस खटावकर, जी व्ही जगताप यांच्या पथकाचा कारवाईकमध्ये समावेश होता. या प्रकरणी संबंधीतांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
तुर्भे मधील कंपनीमध्ये निमयमांचे उल्लंघन करून खाद्यपदार्थ व शितपेयांवरील जुन्या तारखा पुसून नवीन टाकल्या जात होत्या. साठा परवाना व इतर नियमांचे उल्लंघन केले जात होते. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा करून माल सील केला आहे. संबंधीतांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा व अशा प्रकारे इतर कोठे नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी.- बाळासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मनसे सहकार सेना