लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सानपाडा मधील मेरीडीअन सेंटर इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील ९ टंकी हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. हुक्का पार्लरच्या चालकासह एकूण १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकोटीनयुक्त तंबाखूचा साठाही जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरात अनधिकृतपणे हुक्का पार्लरचे पेव वाढू लागले आहे. वाशी, सानपाडा, बेलापूर परिसरातील हुक्का पार्लर रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवले जात आहेत.
एपीएमसीजवळील सत्रा प्लाझा इमारतीमधील हुक्का पार्लरवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. सानपाडा सेक्टर ३० मधील मेरीडीअन सेंटर इमारतीच्या १४ मजल्यावर ९ टंकी हुक्का पार्लर सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी बंदी असलेल्या निकोटीनयुक्त तंबाखूचा वापर केला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश शेट्ये यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री छापा टाकला.
हुक्का पार्लरचा परवाना सुनिल नांगरे यांच्या नावावर असून अरूण ठक्कर यांना चालविण्यास दिला होता. ठक्कर याच्यासह वेटर व हुक्का पिणारे ग्राहक अशा १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हुक्का पार्लरमधून निकोटीनयुक्त तंबाखूही जप्त केली आहे.