नवी मुंबई : वाशीतील साई परिक्रमा लॉजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लॉजच्या मॅनेजरसह पाच महिलांवर कारवाई करून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली आहे. वाशीतील साई प्रेरणा लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. लॉजचा मॅनेजर व दलाल यांच्याकडून त्या ठिकाणी महिला व मुली पुरवल्या जात होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने गुरुवारी रात्री लॉजमध्ये बनावट ग्राहक पाठवला होता. त्याच्याकडून खात्री होताच पोलिसांंच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.वाशी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत तसेच बाल न्याय काळजी आणि संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून सुरू होता व्यवसाय
बारचा मॅनेजर, पाच महिला यांच्यावर कारवाई करून त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्या ठिकाणावरून एका अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. त्याशिवाय लॉजमध्ये महिला पुरवणारा दलाल शाहीन मोंडल यालाही अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत होता.