वर्षात १६२ वेळा लेडिज बारवर धाडी, दहा आस्थापनांवर परवाने निलंबनाची तात्पुरती कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 1, 2025 11:11 IST2025-01-01T11:10:33+5:302025-01-01T11:11:05+5:30
दहा आस्थापनांकडून सतत नियमांची पायमल्ली झाल्याने त्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले होते...

वर्षात १६२ वेळा लेडिज बारवर धाडी, दहा आस्थापनांवर परवाने निलंबनाची तात्पुरती कारवाई
नवी मुंबई : बारच्या परवाना प्रक्रियेतून वगळल्यापासून पोलिसांना बारवर कारवाईतदेखील मर्यादित अधिकार राहिले आहेत. नियमांचे उल्लंघन करून डान्सबार चालवल्याच्या कारणावरून वर्षभरात १६२ वेळा पोलिसांनी बारमध्ये पाऊल टाकत संबंधित आस्थापनांवर कारवाया केल्या आहेत. दहा आस्थापनांकडून सतत नियमांची पायमल्ली झाल्याने त्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले होते.
सद्य:स्थितीला नवी मुंबई, पनवेल परिसरात सुमारे ४० ऑर्केस्ट्रा तर ७० सर्व्हिस बार चालत आहेत. त्यापैकी अनेकांकडून चोरी छुपे ‘बेधडक’ डान्सबार चालवले जात आहेत. परंतु, बारमध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यातून शासन तिजोरीत भर पडत असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून त्याठिकाणी कारवाईत हातघाड्या घातल्या जातात. तर बारवर कारवाईत पोलिसांना अधिकार नसल्याच्या कारणावरून तसेच राजकारण्यांची नाराजी टाळण्यासाठी पोलिसांकडूनही डोळेझाक केली जाते. डान्सबार चालत असल्यास वरिष्ठांकडून होणारी कानउपटणी टाळण्यासाठी अधूनमधून कारवाया केल्या जातात. त्यानुसार चालू वर्षात नवी मुंबई पोलिसांनी डान्सबारवर १६२ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये परिमंडळ एकमध्ये ८९ तर परिमंडळ दोनमध्ये ७३ कारवाया आहेत. त्याशिवाय पोलिस मुख्यालयामार्फत १० आस्थापनांवर पाच दिवस परवाने निलंबनाची कारवाईदेखील झाली आहे. सतत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना हा झटका दिला गेलेला आहे.
अदखलपात्र ११३ तर दखलपात्र ४९ गुन्हे
सर्व्हिस किंवा ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्यानुसार वर्षभरात नवी मुंबई पोलिसांनी डान्सबारवर १६२ कारवाया केल्या आहेत. त्यात दखलपात्र गुन्हे ४९ तर अदखलपात्र ११३ गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगाराचा वावर
डान्सबारमुळे शहराबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती नवी मुंबईत पाय ठेवत आहेत. त्यांचा शहरभर होणारा वावर अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतो. तर आपसातील वादातून हाणामारीच्यादेखील घटना घडल्या आहेत.
शौकिनांची पावले नवी मुंबईकडे
नवी मुंबई, पनवेल परिसरात चालणारे डान्सबार सातत्याने पोलिसांना वादात आणण्यास कारणीभूत ठरले आहेत.
सर्व्हिस बार किंवा ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली परवाने मिळवून अनेक आस्थापना बेकायदेशीरपणे डान्सबार चालवतात.
यामुळे शहराबाहेरील शौकिनांचीदेखील पावले नवी मुंबईकडे वळत आहेत. परंतु, राज्यकर्त्यांचीच इच्छाशक्ती नसल्याने डान्सबारचे दार कायमस्वरूपी बंद होऊ शकलेले नाही.