सहा डान्सबारवर छापे; इतरही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 14, 2024 09:23 AM2024-03-14T09:23:00+5:302024-03-14T09:23:28+5:30

लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन नवी मुंबई पोलिसांचे धाडसत्र 

raids on six dance bars crackdown on other illegal businesses | सहा डान्सबारवर छापे; इतरही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका

सहा डान्सबारवर छापे; इतरही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :नवी मुंबईतील डान्सबार विरोधात लोकमतने आवाज उठविल्यानंतर अखेर डान्सबारवर पोलिसांचे धाडसत्र सुरू झाले आहे. त्यानुसार मंगळवारी अवघ्या एकाच रात्रीत सहा बारवर छापे टाकले. त्यामध्ये काही ठिकाणी मोठ्या संख्येने महिला कामगार आढळून आल्या आहेत.

पनवेलसह नवी मुंबई परिसरातील डान्सबारची वस्तुस्थिती लोकमतने उघड करताच अखेर पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारवर कारवाईची मोहीम हाती घेऊन केलेल्या कारवाईत बारमधील महिला वेटर ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करताना आढळून आल्या. 

या बारवर टाकले छापे

लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दोन्ही परिमंडळ उपायुक्तांना सूचना करून डान्सबारवर कारवाईचे आदेश दिले. शिवाय गुन्हे शाखेलाही कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी रात्री स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकांनी पाच ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीतील चाणक्य ऑर्केस्ट्रा बार, कपल ऑर्केस्ट्रा बार, तसेच  खांदेश्वर पोलिस ठाणे हद्दीत इंटरनेट बार व पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीत साईराज (गोपिका) व चांदणी (साईनिधी) ऑर्केस्ट्रा बार यांचा समावेश आहे. या कारवाईत साईराज बारमध्ये २६ महिला वेटर, १७ पुरुष वेटर तर १४ ग्राहक आढळले. तर चांदणी बारमध्ये ११ महिला वेटर व २ पुरुष वेटर होते. 

परिमंडळ १ मधील शिरवणे येथील रेड रोज बारवरही गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्या ठिकाणी २६ महिला वेटर, ९ पुरुष वेटर तसेच १६ ग्राहक सापडले. त्यांच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  शिरवणे परिसरात अनेक डान्सबार चालत असून सर्वाधिक बारबाला शिरवणे परिसरात राहायला आहेत. यामुळे डान्सबार व बारबाला यांमुळे गावाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याने यापूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. मात्र, उत्पादन शुल्क विभाग, पोलिस व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे ग्रामस्थांचे आंदोलन मोडीत निघाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

 उत्पादन शुल्क विभागाला कळवणार

मोठ्या संख्येने महिला वेटर आढळल्याने त्यांचा नोकरनामा तपासून पुढील कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाला कळवले जाणार आहे. शिवाय इंटरनेट, चाणक्य व कपल या बारमध्ये ऑर्केस्ट्रात काम करणाऱ्या महिला वेटर ग्राहकांसोबत लगट करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अनेक बारचे शटर डाऊन

सर्व्हिस बार, ऑर्केस्ट्रा बार याठिकाणी विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या डान्सबार विरोधात लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले. यामुळे मंगळवारी बहुतांश ठिकाणी नियमाने बार चालवले, तर काहींनी शटर बंदच ठेवून कारवाई टाळली. तर पोलिसांनाही न जुमानता डान्सबार चालवल्याने पाच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली.

बारचालकांकडून कोणत्याही नियमाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. मंगळवारी विविध पथकांमार्फत केलेल्या पाहणीत पाच ठिकाणी डान्सबार सुरू असल्याचे आढळल्याने याप्रकरणी संबंधित बारवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. तर पुढील कारवाईसाठी या कारवाईचा अहवाल उत्पादन शुल्क विभागाला पाठवला जाणार आहे. - विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२

 

Web Title: raids on six dance bars crackdown on other illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.