शहरातील दोन हुक्का पार्लरवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:35 PM2019-04-08T23:35:45+5:302019-04-08T23:35:57+5:30
एपीएमसी पोलिसांची कारवाई : ग्राहकांसह हुक्का चालकांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी अवैधरीत्या चालणाऱ्या दोन हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. सतरा प्लाझा इमारतीमध्ये तसेच कोपरी येथील इमारतीच्या छतावर हे हुक्का पार्लर चालवले जात होते. याप्रकरणी ग्राहकांसह पार्लर चालक व मॅनेजर विरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कायद्याने बंदी असतानाही शहरात अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवले जात आहेत. त्याठिकाणी उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आकर्षणापोटी तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. परिणामी अशा हुक्का पार्लरमध्ये मुला-मुलींचे घोळके रात्री अपरात्री पाहायला मिळत आहेत. अशाच दोन बेकायदेशीर हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे.
कोपरी सेक्टर २६ येथील शिवम कॉम्प्लेक्स सोसायटीच्या छतावर दिवाणखाना फूड हाउसच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवले जात होते. याकरिता छतावर ताडपत्री व कपडा बांधून बंदिस्त जागा करण्यात आली होती. एपीएमसी पोलिसांनी शनिवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला असता, छताच्या दोनपैकी एका भागात हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे उघड झाले. यावेळी त्याठिकाणी १० ते १२ तरुण हुक्का ओढताना आढळून आले. त्यांच्यावर कोप्टा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच हुक्का पार्लर मालक सुशांत यादव (२७) व मॅनेजर चैतन्य भोसले (२६)यांच्यावर एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सतरा प्लाझा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर देखील हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी तिथल्या कॅफे पाम अॅटलान्टीस बारमध्ये हुक्का पार्लर चालत असल्याचे उघड झाले. त्याठिकाणी मुख्य गाळ्यासह पोटमाळ्यावर देखील ग्राहकांसाठी बैठकीची सोय करण्यात आलेली होती. कारवाईवेळी त्याठिकाणी १५ हून अधिक मुले-मुली हुक्का पिताना आढळून आले. त्यामध्ये नवी मुंबईसह तळोजा, मुंबई व ठाण्यातील मुला-मुलींचाही समावेश होता. त्या सर्वांवर कोप्टा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून हुक्का पार्लर चालक निकुंज सावला (२८) व मॅनेजर विश्वास साळवे (३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसी आवारात यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर चालत असल्याची बाब समोर आलेली आहे. महाविद्यालयीन तरुण- तरुणींकडून छोट्या-मोठ्या पार्टीच्या नावाखाली त्याठिकाणी हुक्का पार्ट्या रंगत आहेत.