रायगड - साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दसऱ्याचा मुहुर्त साधून करण्यात येणाऱ्या सोनेखरेदीला रविवारी आर्थिक मंदीचा क्षय जाणवला. लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असूनही एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे मंदीचा काळ सोनेखरेदीचा अक्षय आनंद लुटताच आला नाही. त्यामुळे मार्केट परिसरातही शुकशुकाट दिसून येत होती. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहुर्त असे दसऱ्याचे महत्त्व आहे.
या मुहुर्तावर सोनेखरदीला नागरिक प्राधान्य देतात. दसऱ्यापासून शुभकार्याचे मुहुर्त सुरू होतात. त्यामुळे लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असल्याने, सोनेखरेदीला ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांना होती. मात्र, वाढती महागाई आणि तिच्या जोडीला जाणवत असलेला आर्थिक मंदीचा प्रभाव यंदाच्या सोनेखरेदीवरही होता. काही सराफांनी तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना लढवल्या होत्या. मात्र, तरीही सोनखरेदीला म्हणावी तेवढी चालना मिळाली नसल्याचे काही सराफांनी सांगितले.
दसऱ्याला सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, सणाला यंदा आर्थिक मंदीचा फेरा जाणवत आहे, त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटाबंदीमुळे अजूनही मंदी असल्याने अनेकांना सोनेखरेदीची इच्छा असूनही सोनेखरेदी करता आले नाही. काही ग्राृहकांनी केवळ मुहुर्ताचीच खरेदी केली. महागाईमुळे सोने खरेदी होत असली, तरी जेवढे बजेट आहे, त्यामध्ये बसेल तेवढेच सोनेखरेदी करण्याकडेच ग्राहकांचा कल असल्याचे जाणवले.