रायगड महोत्सव म्हणजे गावची जत्राच!
By admin | Published: January 25, 2016 02:43 AM2016-01-25T02:43:56+5:302016-01-25T02:43:56+5:30
हाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाने रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली.
दासगाव(सिकंदर अनवारे) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाने रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली. पाचाड येथे तयार केलेली शिवसृष्टी म्हणजे केवळ दिखावाच होता. केवळ स्टॉल आणि स्टेज शो याव्यतरिक्त कोणतेच वेगळेपण नसल्याने हा महोत्सव म्हणजे गावची जत्राच असल्याची प्रतिक्रीया स्थानिक तसेच पर्यटकांतून उमटत होती. पाचाडमधील दुकानदार, हॉटेल व्यवसायीक तसेच या शिवसृष्टीतील स्टॉलधारकांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर उमटत होता. राजा शिव छत्रपती या मालिकेतील सेट उभे करून नितीन देसाई यांनी व्यवसाय केला आणि शासनाने पर्यटकांना उल्लु बनवले.
गेली तिन दिवस चाललेल्या रायगड महोत्सवाला शेवटच्या दोन दिवसात प्रतिसाद मिळाला मात्र याठिकाणी आलेल्या प्रत्येक शिवप्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. आगाऊ बुकींगमुळे किल्ल्यावर जाणे शक्य नसल्याने पाचाड येथे प्रचंड गर्दी झाली. यामुळे कोंझर ते पाचाड या घाटात जवळपास एक तासाची वाहतुक कोंडी झाली. यामध्ये त्रस्त झालेल्या पर्यटकांना पाचाडमध्ये आल्यानंतर केवळ खाद्यपदार्थांच्या स्टॉल व्यतरीक्त कांहीच वेगळेपण न दिसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. याठिकाणी केवळ शस्त्रप्रदर्शनालाच रांगा लागल्या होत्या. याठिकाणी काढण्यात आलेली रांगोळी धुळ बसल्याने ही रांगोळी धुळीने काढलेली आहे का अशी स्थिती निर्माण झाली होती. या धुळीमुळे खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. यामुळे स्टॉलधारकांना अल्प प्रतिसाद मिळाला. तर किल्ले रायगडावरील बाजार पेठेत चिनी फेंगशुईच्या मुती, अष्टविनायाकातील गणपती मुर्ती, टीफीनचा पितळी डबा, रॉकेलवर चालणारा कंदील, हŸाीच्या सोंडेवरील झालर, आणि आजच्या काळातील मिठाई अशा वस्तु मांडण्यात आल्या होत्या. खरोखरच या वस्तु शिवकालात आणि राजधानीच्या बाजार पेठेत विक्रीसाठी होत्या का? असा प्रश्न पर्यटक करीत होते. याठिकाणी कांही सामाजीक संस्थांनी २० रूपयांची पाणी बाटली १० रूपयांत विकणे सुरू केले तर पाचाड ते रोप वे दरम्यान नितीन देसाई यंनी मोफत गाडी सुरू केली यामुळे स्थानिक व्यवसायीकांना याचा चांगलाच फटका बसला.
केवळ स्टॉल व सायंकाळी होत असलेल्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण पाहता वेगळेपण असे काहीच नव्हते. परंतु महाड तालुक्यात शासनाने प्रथमच अशा प्रकारचा दिलेला मोठा कार्यक्रम व नितीन देसाईंच्या कलाप्रकारांचे आकर्षण यासाठी शनिवार - रविवार या दोन दिवसात रायगडमधील नागरीकांनी गर्दी केली होती. रायगड वगळता रस्त्यावर इतर जिल्हातील गाड्या दिसत नव्हत्या. शासनाचा कार्यक्रम असला तरी स्थानिकांना डावलून केलेल्या या कार्यक्रमात स्थानिक प्रशासनालाही कवडीमोल किंमत देण्यात आली. स्टेज शो असलेल्या ठिकाणी देखील ठेकेदाराच्या कामगारांचीच मनमानी होत असल्याने अनेक अधिकाऽयांना बाहेरून कार्यक्रम पाहण्याची पाळी आली.