मशालींच्या प्रकाशात उजळला ‘किल्ले रायगड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2015 12:02 AM2015-11-10T00:02:46+5:302015-11-10T00:02:46+5:30
दिवाळीत प्रत्येकजण आपले घर दिवे आणि रोषणाईने उजळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्यांच्यामुळे हा सण आज साजरा होत आहे त्या छत्रपत्री शिवाजी महाराजांचा ‘रायगड किल्ला’ मात्र ऐन दिवाळीतही अंधारात असतो.
रोहित नाईक, रायगड
दिवाळीत प्रत्येकजण आपले घर दिवे आणि रोषणाईने उजळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्यांच्यामुळे हा सण आज साजरा होत आहे त्या छत्रपत्री शिवाजी महाराजांचा ‘रायगड किल्ला’ मात्र ऐन दिवाळीतही अंधारात असतो. यासाठीच ‘पहिली पणती महाराजांच्या चरणी आणि त्यानंतर स्वत:च्या घरी’ असे म्हणत तमाम
शिवभक्तांनी किल्ले रायगडावर
शेकडो पणत्या आणि तब्बल ३४३ मशाली प्रज्वलीत करुन महाराजांना मानवंदना दिली.
श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने दरवर्षी ‘शिवचैतन्य’ अंतर्गत वसुबारसच्या दिवशी रायगडावर दिवाळी पहाट साजरी केली जाते. यावर्षी या सोहळ्याचे चौथे वर्ष होते. सुमारे ३०० हून अधिक शिवभक्तांनी या सोहळ्याची सुरुवात शिरकाई देवीच्या पुजनाने केली. येथूनच सर्वांनी ‘एक व्यक्ती एक मशाल’ याप्रमाणे मशाली प्रज्वलित करुन मशालींच्या उजेडात आणि ढोलाताशांच्या गजरात महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
होळीच्या माळावर शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर याठिकाणी ‘आम्ही मावळे’ ढोलपथकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. मध्यरात्री ठिक १२ वाजता राजदरबारात पालखी आणल्यानंतर अवघा दरबार मशालींच्या उजेडात प्रकाशमय
झाला. येथे महाराजांचे पूजन झाल्यानंतर शिवशाहीरांनी रात्र जागवल्याने उपस्थितांनी पुन्हा एकदा किल्ले रायगडावर ‘शिवशाही’चा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी जगदिश्वराच्या मंदिरात पुजा केल्यानंतर समितीच्या वतीने
गडावरील घराघरात दिवाळीचा फराळ वाटून या सोहळ्याची उत्साहात सांगता केली.