Raigad Mango: रायगडचा आंबा २,५०० रुपये डझन, एपीएमसीत आगमन; खवय्यांना झाला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 08:33 AM2023-02-03T08:33:13+5:302023-02-03T08:33:49+5:30
Raigad Mango: रायगड जिल्ह्यातील आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला. अलिबाग येथील शेतकरी संजयकुमार मारुती पाटील व वरूण संजयकुमार पाटील यांच्या शेतातील हापूस आणि केशर जातीचे आंबे असून, ते बाजारात दाखल झाले आहेत.
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला. अलिबाग येथील शेतकरी संजयकुमार मारुती पाटील व वरूण संजयकुमार पाटील यांच्या शेतातील हापूस आणि केशर जातीचे आंबे असून, ते बाजारात दाखल झाले आहेत. आंबा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असून, खवय्यांना आंब्याची चव यंदा लवकर चाखायला मिळणार आहे. रायगडमधील आंब्याच्या एक डझनला दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
वातावरणातील बदलाचा उत्पादनावर परिणाम होणार आणि यंदा आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बाजारात आंबा दाखल झाला आहे. कोकणातील हापूस आंब्याची तीन टप्प्यांमध्ये फूट होते. पहिला मोहोर हा सप्टेंबर आणि दुसरा मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा मोहोर हा जानेवारी महिन्यात असतो. त्यानुसार आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरू होते. अलिबागच्या शेतकऱ्याच्या शेतातील हापूस आंब्याचे २ डझनचे बारा बॉक्स व चार केशर बॉक्स एपीएमसीतील भगवान शिंगोटे आणि संजय गावडे यांच्या कंपनीत दाखल झाले. या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करून विक्री करण्यात येत आहे.