मद्यविक्री बंदीकरिता रायगड पोलीस सज्ज
By admin | Published: April 1, 2017 11:45 PM2017-04-01T23:45:11+5:302017-04-01T23:45:11+5:30
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील मद्यविक्री बंदीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहे.
अलिबाग : राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील मद्यविक्री बंदीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस क्षेत्रातील अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे.
अवैध दारूचे समूळ निर्मूलन करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे. पारसकर यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊ न दारूबंदीच्या विशेष अभियानाची माहिती दिली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील व पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे उपस्थित होते.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील अवैध दारूनिर्मिती आणि त्याची विक्री यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस कारवाई झाली तरी आरोपी सुटल्यानंतर अवैध दारूच्या व्यवसाय अधिक जोमाने सुरू करतात.
समुद्री खाड्या, जंगलभागात दारूनिर्मिती, वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. लोकसहभाग वाढल्यास ही अवैध दारू बंद होऊ शकते, असा विश्वास पोलीस अधीक्षक पारसकर यांनी व्यक्त केला असून अवैध दारूनिर्मिती व विक्रीची माहिती देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. या विशेष अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आपल्या भागात सुरू असलेली अवैध दारूनिर्मिती, विक्री व वाहतूक याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी, अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क करून व्हॉट्स अॅप, एसएमएसद्वारे माहिती द्यावी. स्थानिक पोलीस त्यावर तातडीने कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान स्थानिक पोलीस कारवाई करीत नसतील, तर त्यांच्यावरही आपण करवाई करू असा इशारा देऊन, अवैध दारूबद्दल माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त राहील, असे त्यांनी सांगितले.
अवैध दारू व्यवसायामध्ये जर एखादा आरोपी वारंवार सहभागी असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल.
जिल्हातील अवैध दारू विरोधात या अभियानात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी अखेरीस केले आहे.
(विशेष प्रतिनिधी)