रायगडमधील समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:07 AM2018-08-12T03:07:25+5:302018-08-12T03:08:19+5:30
पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले.
पनवेल : पनवेलसह रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रेल्वेविषयक मूलभूत सुविधा सोडवाव्यात, या मागणीसाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सतीश धारप, माजी आमदार देवेंद्र साटम, विष्णू पाटील, अॅड. महेश मोहिते, गंगाधर पाटील आदीसह भाजपाच्या जिल्हा पदाधिकाºयांचा समावेश होता. कोकण रेल्वेच्या दक्षिणेकडे जाणाºया लांबपल्ल्याच्या गाड्या पेण व रोहा रेल्वेस्थानकांमध्ये थांबाव्यात. तेथे या सर्व गाड्यांना आरक्षण कोटासुद्धा उपलब्ध व्हावा, दिवा-रोहा रेल्वेला १२ डब्यांऐवजी १५ डबे असावेत. दिवा-रोहा रेल्वेची १ फेरी वाढवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. पेण रेल्वेस्थानकातून रिटर्न तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही या वेळी उपस्थित पदाधिकाºयांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे केली.
रोहा रेल्वेस्थानकाबाहेर दोन्ही बाजूस रेल्वे फाटक आहे. हे बंद करून ५० टक्के राज्य सरकारचा सहभाग व ५० टक्के केंद्राचा सहभाग या तत्त्वावर दोन्ही रेल्वेवरील उड्डाणपूल बांधण्याकरिता राज्य सरकारने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. रोहा रेल्वेस्थानकात सर्व रेल्वेगाड्या तांत्रिक पूर्ततेकरिता थांबतात, त्या ऐवजी सर्व गाड्यांना रोहा हा अधिकृत थांबा घोषित व्हावा, याकरिता विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना शक्यता तपासणीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच पनवेल स्टेशनवर अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाव्यात, कोकण रेल्वे मार्गावर लांबपल्ल्यांच्या सर्वच रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, हार्बर लाइन्सवर जादा गाड्या सोडाव्यात आदी मागण्यांचाही यात समावेश करण्यात आला होता.