रायगडाला शिवकालीन वैभव प्राप्त करून देता येईल
By admin | Published: January 20, 2016 02:04 AM2016-01-20T02:04:48+5:302016-01-20T02:04:48+5:30
सरकारची इच्छा असेल तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची पुनर्बांधणी आणि या गडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देणे शक्य असल्याचे प्रतिपादन
महाड : सरकारची इच्छा असेल तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची पुनर्बांधणी आणि या गडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देणे शक्य असल्याचे प्रतिपादन कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केले. रायगड महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाच्या रूपरेषेविषयी सोमवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नितीन देसाई यांनी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी देसाई यांनी किल्ले रायगड आणि पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळाच्या दयनीय अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवनेरी किल्ल्याच्या धर्तीवर रायगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार असून केंद्र व राज्य शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर पाच ते दहा वर्षांत या गडाला शिवकालीन वैभव प्राप्त करुन देता येईल. त्यासाठी एक शिवभक्त आणि मावळा म्हणून त्यात सहभागी होण्यास आपण तयार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने रायगडावर २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड महोत्सवाचे आयोजन केले आहे. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी (तात्पुरती) आणि शिवकालीन वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. याबाबत बोलताना नितीन देसाई यांनी सांगितले की, रायगड महोत्सव म्हणजे माझ्यासाठी एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.
गडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करुन हा सोहळा जगासमोर आणण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून केले जाणार आहे. यातून गडाचा विकास साधण्यासाठी एक नवे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे. किल्ले रायगड परिसरात कायमस्वरुपी शिवसृष्टी उभी राहावी. मात्र पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे गडावर शिवसृष्टी उभारता येणे शक्य नाही. महोत्सवाच्या काळात शिवकालीन इतिहास जगासमोर येईल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
महोत्सवाच्या काळात किमान २५ हजार शिवभक्त गडावर येतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. रोपवेची मर्यादा लक्षात घेता या रोपवेचा वापर शक्यतो ज्येष्ठ नागरिकांना करु द्यावा आणि तरुणांनी पायऱ्यांनी चढून गडावर जावे, असे आवाहन देसाई यांनी केले.
रायगड महोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. (वार्ताहर)