नेरूळ-उरण लोकलसाठी रेल्वेची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 03:01 AM2018-05-01T03:01:09+5:302018-05-01T03:01:09+5:30

नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शविली आहे.

Railway check-up for Nerul-Uran locales | नेरूळ-उरण लोकलसाठी रेल्वेची चाचपणी

नेरूळ-उरण लोकलसाठी रेल्वेची चाचपणी

Next

नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शविली आहे. तसे सिडकोला कळविण्यात आले असून पुढील महिनाभरात या मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता सिडकोने वर्तविली आहे.
सिडकोने जुलै १९९७ मध्ये नेरूळ-उरण या २७ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. अखेर जून २0१२ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात आहे. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. या मार्गावरील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे, तर त्यापुढील चार किलोमीटरच्या पट्ट्यात खारफुटी व भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाल्याने हे काम रखडले होते. परंतु आता हा अडथळाही दूर झाल्याने पुढील टप्प्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. दरम्यान, तूर्तास खारकोपर स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या स्थानकापर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील तिसऱ्या क्रमांकाचे तरघर स्थानकाचे काम अद्यापि प्राथमिक अवस्थेत आहे. परंतु लोकल थांबविण्याइतपत स्थानकाचे काम पूर्ण झालेले आहे. असे असले तरी या स्थानकावर लोकलला थांबा द्यायचा की नाही, हे स्थानक वगळून थेट चौथ्या क्रमांकाच्या बामणडोंगरी स्थानकावर लोकल थांबवायची याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.

तरघर : वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना या मार्गावरील तरघर हे भव्य व दिव्य रेल्वेस्थानक ठरणार आहे. या स्थानकासाठी तब्बल ११२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. काही महिन्यापूर्वी या कामाच्या निविदा काढून बी.जी. बेलेकर कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. यात २७0 मीटर लांबीचे चार फलाट प्रस्तावित करण्यात आले आहेत. स्थानकाच्या इमारतीत वाणिज्य कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. यात विविध कार्यालयांसह दोन तिकीट कार्यालये असणार आहेत, तर स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले असून वाहनतळावर जाण्यासाठी
रॅम्पची सुविधा असणार आहे. एकूणच तरघर स्थानक नेरूळ-उरण मार्गावरील वास्तुशिल्पाच्या दृष्टीने एक आकर्षण ठरेल,
असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

मार्च २0१८ ची डेडलाइन हुकली : नेरूळ-उरण मार्गावर एकूण १0 रेल्वे स्थानके आहेत. यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २0१७ मध्ये पहिला टप्पा सुरू करण्याचे सिडकोकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु विविध कारणांमुळे कामाची गती मंदावल्याने मार्च २0१८ची डेडलाइन देण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा मुहूर्तही टळला आहे. असे असले तरी पुढील महिनाभरात पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे आणि सिडकोने घेतला आहे.

तरघर स्थानकाची उपयुक्तता : शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक या प्रकल्पाला जोडला जाणारा कोस्टल रोड तरघर स्थानकाला लागूनच असलेल्या पामबीच मार्गाला जोडला जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील खांदेश्वर स्थानकापासून नियोजित तरघर स्थानकादरम्यान स्कायट्रेन सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत येण्यासाठी तरघर हे केंद्रबिंदू ठरणार आहे.

मार्गावर १0 स्थानके
नेरूळ-उरण मार्गावर एकूण १0 रेल्वे स्थानके आहेत. यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच स्थानकांची कामे भूसंपादनाअभावी रखडली होती. परंतु आता हा अडथळाही दूर झाल्याने सिडकोने उर्वरित कामाला गती दिली आहे.

Web Title: Railway check-up for Nerul-Uran locales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.