पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा नकार
By admin | Published: November 17, 2016 05:18 AM2016-11-17T05:18:06+5:302016-11-17T05:18:06+5:30
जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश असतानाही नालासोपारा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटां न घेता मग्रुरी केला जात आहे.
शशी करपे
वसई : जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश असतानाही नालासोपारा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटां न घेता मग्रुरी केला जात आहे. शासनाने आदेश दिला ना मग शासनाकडून सुट्टे घेवून असे उद्धट उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक बँकांनी फक्त खातेदारांनाच प्रवेश देऊन खाते नसलेल्यांना जुन्या नोटा बदलून देण्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वसईकर संतापले आहेत.
पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा रेल्वेत स्वीकारण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे शेकडो प्रवाशांनी तिकीट आणि स्मार्टकार्ड रिचार्जंसाठी पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न रेल्वेच कर्मचाऱ्यांनी हाणून पाडतानाच त्यांना खडे बोलही सुनावण्यास सुरुवात केली आहे. पाचशे रुपयांची नोट देवून शंभर रुपयांचा स्मार्टकार्ड रिचार्ज करण्याची मागणी केल्यावर ती नोट न घेता सुट्टे घेवून या. असे नालासोपाऱ्यातील तिकीट क्लार्ककडून सुनावली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे अनेक प्रवाशांनी सुटे पैसे नसल्यामुळे विना तिकीट प्रवास करण्याचे धाडस केले आहे. नालासोपारातील रेल्वेचे कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला विना तिकीट प्रवास करावा लागत असल्याचेही काही प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे होणाऱ्या रेल्वेच्या नुकसानीला जबाबदार धरून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.
वसई पूर्वेतील काही खासगी बँकांनी आजपासून केवळ बँक खातेदारांनाच जुने चलन बदलण्याची मुभा उपलब्ध करुन दिल्याने संतापाचा पारा चढला होता.
विशेष म्हणजे पाचशे रुपयांचे चलन अद्याप बँकांपर्यत उपलब्ध झालेले नसल्याने दोन हजारांच्या नोटांचे बँकांकडून वितरण सुरु आहे.
काही बँकांचे एटीएम वगळल्यास बहुतांश एटीएममधून अद्यापही पैसे काढता येत नसल्याने नागरीकांची बँकांबाहेरची झुंबड ओसरण्याचे नाव घेत नाही. अशावेळी वसई पूर्वेतील काही बँकांनी दुपारनंतर केवळ बँक खातेदारानांच बँकेत प्रवेश देण्यास सुरुवात केल्याने तासनतास रांगेत उभ्या राहिलेल्या नागरीकांची प्रचंड गैरसोय झाली.
परिणामी बँक कर्मचारी व नागरीकांमध्ये काही ठिकाणी शाब्दीक बाचाबाची होताना दिसली. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सर्वच बँकांनी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. परंतु वसई पूर्वेतील काही बँकांनी केवळ खातेदारांनाच प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याने नागरीकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
वसई फाटा येथून आज काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी चालत वसई पूर्वेत आले होते. सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर या नागरीकांना नोटा बदलून मिळणार नाही, असे बँकेकडून सांगण्यात आल्याने त्या नागरीकांना अन्य बँकेत जाऊन पुन्हा रांगेत उन्हातान्हात तिष्ठत उभे राहावे लागले.