नवी मुंबई : न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नवी मुंबईत येणार आहेत. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच कार्यक्रमादरम्यान उरण-नेरूळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे म्हणजेच खारकोपर ते उरण दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची शनिवारी पाहणी केल्याने या शक्यतेला अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे.
नेरूळ - उरण मार्गावरील नेरूळ ते खारकोपरदरम्यानचा पहिला टप्पा यापूर्वीच प्रवाशांसाठी खुला झाला आहे. परंतु, खारकोपर ते उरणदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. सध्या ते पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेने गेल्या मार्च महिन्यात चाचणीही घेतली होती. एकूणच नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा हा मार्ग प्रवासी सेवेसाठी सज्ज असतानासुद्धा केवळ उद्घाटनाअभावी ही सेवा रखडली आहे. आता १२ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होईल, असे आडाखे बांधले जात आहेत.
तपासणी वाहनाद्वारे केली पाहणी
मागील वर्षभरापासून लोकल सेवेसाठी सज्ज असलेल्या नेरूळ - उरण रेल्वे मार्गाच्या खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्याची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपासणी वाहनाद्वारे खारकोपर ते उरण या मार्गावरील स्थानकांची पाहणी केली. त्यामुळे लवकरच या मार्गावरून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.