रेल्वे पोलिसांच्या जीपची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:50 AM2017-07-24T06:50:31+5:302017-07-24T06:50:31+5:30

रेल्वे पोलिसांच्या जीपने फॉर्च्युनर कारला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना पामबीच मार्गावर शनिवारी रात्री घडली. अपघातामध्ये कारमधील

Railway Jeep's car hits the Jeep | रेल्वे पोलिसांच्या जीपची कारला धडक

रेल्वे पोलिसांच्या जीपची कारला धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रेल्वे पोलिसांच्या जीपने फॉर्च्युनर कारला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना पामबीच मार्गावर शनिवारी रात्री घडली. अपघातामध्ये कारमधील तिघे जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव कारने पोलिसांच्या जीपला कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ती फॉर्च्युनरला धडकल्याने हा अपघात झाला.
शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर नेरुळ येथे हा अपघात झाला. मुंबई रेल्वे पोलिसांची जीप वाशीच्या दिशेने येत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारच्या चालकाने हुलकावणी दिली. कार चालकाने अचानकपणे मारलेल्या कटमुळे पोलिसांच्या जीप चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे जीप दुसऱ्या लेनमध्ये जावून फॉर्च्युनर कारला धडकली. तर जीपच्या धडकेने फॉर्च्युनर कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की फॉर्च्युनर कारने दोन पलटी मारल्या. अपघातामध्ये जीवितहानीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वेळीच काही प्रत्यक्षदर्शींनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांकडे धाव घेवून आतमधील व्यक्तींना बाहेर काढले. यावेळी फॉर्च्युनरमधील एक महिला व दोघे पुरुष जखमी असल्याचे आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सीवूड वाहतूक पोलीस व नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने मार्गातून बाजूला हटवून वाहतुकीतला अडथळा दूर करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले.
अपघातावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांच्या जीपला कट मारणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा शोध सुरू असल्याचे नेरुळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक थारकर यांनी सांगितले.

Web Title: Railway Jeep's car hits the Jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.