कोकण रेल्वेची परिपूर्ण सुसज्जता : पावसाळ्यात नऊ स्थानकांत रेल्वे मेंटेनन्स वाहने, नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा

By नारायण जाधव | Published: June 20, 2024 06:19 PM2024-06-20T18:19:58+5:302024-06-20T18:21:36+5:30

सहा ठिकाणी वैद्यकीय पथके अन् ६७२ जवान घालणार मार्गावर २४ तास गस्त...

Railway maintenance vehicles at nine stations during monsoons, flood warning systems on rivers | कोकण रेल्वेची परिपूर्ण सुसज्जता : पावसाळ्यात नऊ स्थानकांत रेल्वे मेंटेनन्स वाहने, नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा

कोकण रेल्वेची परिपूर्ण सुसज्जता : पावसाळ्यात नऊ स्थानकांत रेल्वे मेंटेनन्स वाहने, नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा

नवी मुंबई : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेने पूर्ण तयारी केली असून सर्व यंत्रणा ठिकठिकाणी तैनात केल्या आहेत. प्रशासनही संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या सुरळीत धावतील, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. त्यात गस्तीसाठी ६७२ जवान, ९ स्थानकांत रेल्वे मेन्टेनन्स वाहन, वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेन आणि प्रमुख नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा बसविली असल्याची माहिती गुरुवारी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरिश करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अशी आहे मान्सून पेट्रोलिंग
पावसाळ्यात रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी ६७२ जवान तैनात केले असून असुरक्षित ठिकाणी ते चोवीस तास गस्त घालणार आहेत. तसेच या भागात रेल्वेचे वेगावरील निर्बंध लादले आहेत. ९ ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल ठेवले आहे. त्यामुळे आणीबाणीत ते मदतीस धावून जाईल. त्यात वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी स्थानकांचा समावेश आहे तर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे त्वरित आपत्कालीन प्रतिसादासाठी टॉवर वॅगन्स उभ्या केल्या आहेत.

अपघात झाल्यावर १५ मिनिटांत मदतीस ट्रेन
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर मोठे धुके असल्याने दृश्यमानता कमी होते. त्यामुळे लोको पायलटना ट्रेनचा वेग ४० किमी/ताशी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय सहाय्याने सुसज्ज स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन ठेवल्या आहेत. १५ मिनिटांत येण्यासाठी वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेनदेखील सज्ज आहे.

रूळांवर १०० मिमीपेक्षा जास्त पाणी साचल्यास गाड्या राहणार बंद
ट्रॅकवरील पाण्याची पातळी १०० मिमीपेक्षा जास्त असेल अशा परिस्थितीत, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करून, पाणी कमी होईपर्यंत रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. नियंत्रण कार्यालय/स्थानकांशी आपत्कालीन संप्रेषणासाठी मोबाइल फोनसह सुसज्ज सुरक्षा कर्मचारी ठेवले असून लोको पायलट आणि रक्षकांना वॉकी-टॉकी सेट दिले जाणार आहेत.

नऊ स्थानकांवर स्वयं-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक
इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स मार्गावर अंदाजे प्रत्येक १ किमी अंतरावर स्थापित केले जाणार असून जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत गस्तीचे कर्मचारी, वॉचमन, लोको पायलट गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचारी यांच्यात तत्काळ संपर्क साधता येईल. पावसाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी नऊ स्थानकांवर (माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी) स्वयं-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक स्थापित केले आहेत.

या नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा
काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), साीवित्री नदी (वीर आणि सापे वामणेदरम्यान) आणि वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठेदरम्यान) या तीन पुलांवर पूर चेतावनी यंत्रणा बसवल्यामुळे पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना सतर्क केले जाईल.

चार ठिकाणी ॲनिमोमीटर
वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पनवेल मार्ग (रत्नागिरी आणि निवासर दरम्यान), मांडोवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि मानकी दरम्यान) या चार ठिकाणी ॲनिमोमीटर स्थापित केले आहेत.

चोवीस तास नियंत्रण कक्ष
बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात सुरक्षित ट्रेनचे संचालन सुनिश्चित करण्यासाठी २४/७ कार्यरत राहतील.
 

Web Title: Railway maintenance vehicles at nine stations during monsoons, flood warning systems on rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.