नवी मुंबई : रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाला उपचाराऐवजी पुढच्या रेल्वेत बसवून सोडून दिल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सखोल चौकशीत रेल्वे पोलीस व होमगार्ड यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानुसार, रेल्वे पोलिसाला निलंबित केले आले असून, दोघा होमगार्डवरही कारवाईचा अहवाल पाठविण्यात आला आहे.पनवेल रेल्वे पोलिसांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली. २२ जुलै रोजी कारशेडमधून पनवेल स्थानकात आलेल्या रेल्वेत एक मृतदेह असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. यानुसार, रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. मात्र, ओळखीबाबत कोणाताही पुरावा न आढळल्याने, मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक राजेश बापशेट्टी यांनी विशेष पथकामार्फत त्याच्या मृत्यूबाबत शोध घेण्यास सुरुवात केली. २१ जुलैच्या मध्यरात्री सानपाडा स्थानकात रेल्वेतून पडून तो जखमी झाल्याचे उघड झाले, परंतु त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी उपस्थित रेल्वे पोलीस व होमगार्ड यांनी त्याला रात्री १ वाजता पनवेल रेल्वेत बसविले. हा प्रकार स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र, ती रेल्वे पनवेल स्थानकातून कारशेडला जमा झाल्याने, तो तरुण रात्रभर उपचाराविना रेल्वेत पडून होता. या दरम्यान रेल्वे कारशेडला जमा होताना पाहणी करणाºया काही रेल्वे कर्मचाºयांनीही त्याला पाहिले. मात्र, मद्यपी समजून त्यांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले.अखेर दुसºया दिवशी सकाळी ही रेल्वे पुन्हा पनवेल स्थानकात आली असता, काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती दिली. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत तरुणाची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात पनवेल रेल्वे पोलिसांना हा संपूर्ण प्रकार उघड झाला. यानुसार, तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीचा अहवाल तयार करून तो रेल्वे पोलीस आयुक्तांकडे सादर केला असल्याचे पोलीस निरीक्षक बापशेट्टी यांनी सांगितले.या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी नीलेश पवार याला निलंबित करण्यात आले आहे, तसेच शंकर साळुंखे व संतोष साळुंखे या दोघा होमगार्डचाही अहवाल रेल्वे पोलिसांकडून त्यांच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. एक महिन्याचा कालावधी उलटूनही, त्या मयत तरुणाची ओळख पटली नसल्याचे बापशेट्टी यांनी सांगितले. चेहरापट्टीवरून तो नेपाळी असल्याच्या संशयाने अनेक नेपाळी संघटना, सुरक्षारक्षक यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
रेल्वे कर्मचा-यामुळे प्रवाशाचा मृत्यू, पनवेल स्थानकातील घटना, एकाचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:06 AM