शहरातील रेल्वे स्थानकांसह प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:23 AM2018-12-27T04:23:50+5:302018-12-27T04:24:18+5:30
नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.
नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे आहे.
नवी मुंबई शहर सिडकोने निर्माण करताना नागरिकांना दळणवळणासाठी रेल्वे सुरू केली. भविष्यात मुंबईप्रमाणे नवी मुंबई शहरात देखील लोकसंख्या वाढणार असल्याची दखल घेत अत्याधुनिक आणि सोयी-सुविधायुक्त रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे. परंतु रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा यंत्रणा अपुरी पडू लागली असून अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आगीसारख्या घटना घडल्यास कोणतीही प्राथमिक उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. स्थानकातील सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली होती, परंतु या यंत्रणेची देखभाल दुरु स्ती होत नसल्याने सदरची यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये सिडकोने व्यावसायिक गाळे, कार्यालये बांधली आहेत. यामध्ये विविध आयटी कंपन्यांची कार्यालये, खासगी व्यावसायिक कार्यालये, सिनेमा गृह, मॉल, शॉपिंग सेंटर, बँका, एटीएम, हॉटेल, फास्ट फूडचे स्टॉल आदी थाटण्यात आले आहेत. यामधील बºयाच ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. परंतु रेल्वे स्थानकामधील अनेक ठिकाणी फास्ट फूडचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कोणतीही परवानगी न घेताच सर्रास घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत. त्यामुळे देखील एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकात विविध विद्युत केबलचे जाळे पसरले असून त्याकडे देखील सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांमध्ये ठेवण्यात आलेल्या बंकरची देखील दुरवस्था झाली असून बंकरच्या आतील बाजूस कचºयाचे साम्राज्य पसरले आहे.
रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी सिडकोने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे, परंतु या सुरक्षा रक्षकांना न जुमानता स्थानकांच्या आवारात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अग्निरोधक यंत्र चालविण्याचे अज्ञान
नेरु ळ रेल्वे स्थानकातील द्वारका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. यावेळी हॉटेलमधील कर्मचाºयांना अग्निरोधक यंत्रणा हाताळण्याची माहिती नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. तसाच प्रकार मागील आठवड्यात नेरु ळ रेल्वे स्थानकातील युनियन बँकेत लागलेल्या आगीवर देखील अग्निरोधक यंत्र हाताळण्याचे ज्ञान नसल्याने अग्निरोधक यंत्र असतानाही आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही.