नवी मुंबईलाही पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:53 PM2019-07-27T23:53:00+5:302019-07-27T23:53:32+5:30
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल २२ वृक्ष कोसळले असून, तीन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. शनिवारी पहाटेपासून पाऊस वाढल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
नवी मुंबईमध्ये २६ जुलैला २४ तासामध्ये तब्बल सरासरी २२१ मिमी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ७८ मिमी. पावसाची नोंद झाली होती. एकाच दिवशी १५ वृक्ष कोसळले. शनिवारीही शहरवासीयांना पाऊसाने झोडपले. यामुळे हजारो नागरिकांना नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. सायंकाळपर्यंत वाशीमध्ये २ व सीबीडीमध्ये ४ वृक्ष कोसळले. नेरूळ सेक्टर ११ मध्ये संरक्षण भिंत कोसळली असून, दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली होती, परंतु सुट्टीची माहिती न मिळाल्यामुळे अनेक विभागामध्ये शाळा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईमध्ये ३३ ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महापालिका प्रशासनावर चौफेर टीका झाली होती. यानंतर, प्रशासनाने पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक कामे केल्यामुळे दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कुठेच साचले नाही.
मुसळधार पाऊस सुरू असूनही मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार सुरळीत होते. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर काही प्रमाणात पाणी साचले होते, पण त्याचा खरेदी-विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. भाजी मार्केटमध्ये १०० ट्रक व ४४३ टेम्पो अशी एकूण ५४३ वाहनांची आवक झाली असून, ५६२ वाहनांमधील भाजीपाला मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये वितरित झाला आहे. दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते, अशी माहिती बाजारसमिती अधिकाऱ्यांनी दिली.
उरणमध्ये मुसळधार पाऊस
मुसळधार पावसामुळे उरण येथील बोकडवीरा गावातील रहिवाशाच्या घराचे मोठे नुकसान झाले. जयवंत रोहिदास डाकी यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. केगाव येथे झाड कोसळल्याने त्या ठिकाणच्या काही घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. रांजणपाडा येथील गावात पावसाचे पाणी शिरले असल्याची माहिती तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. जोरदार पावसामुळे मोरा भाऊचा धक्का दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती.