नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मोसमी पावसाने कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागांसह अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आगेकूच केली आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील ३ दिवसांत मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून पुढील चार-पाच दिवसांत मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, गोव्यासह तळकोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या भागात आणखी आगेकूच करेल.
राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी राज्यभरात पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण कोकणात पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये भीषण उकाडा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत राजस्थानच्या फलौदीमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. तर राजधानी दिल्लीतसुद्धा ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला होता. उत्तरप्रदेशच्या अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत.