नवी मुंबई - महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारी २४ तासामध्ये ८५ मीमी पावसाची नोंद झाली होती. गुरूवारी चार वाजेपर्यंत ४७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. पामबीच रोडवर एक कार दुभाजकाला धडकली. खड्यांमुळे सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाची आठवण शहरवासीयांना झाला. बुधवारी दिवसभरात कोपरखेरणेमध्ये १३३ व बेलापूरमध्ये ११५ मीमी पावसाची नोंद झाली. दिवसभरात २ वृक्ष कोसळले. एक ठिकाणी आग लागली. १ ठिकाणी शाॅर्टसर्किट झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गुरूवारी पहाटेपासून सर्व विभागात पाऊस सुरू आहे. पामबीच रोडवर वाशीतील पामबीच गॅलरीया मॉलसमोर एक कार दुभाजकाला धडकली. सायन - पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांवर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्यांमुळे नेरूळमध्ये अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात झाला.
शहरात नेरूळ, मॅफ्को, एमआयडीसीमध्ये इंडीयन ऑईल कंपनीच्या गेट समोर, इंदिरानगर महापे रोडवर तीन ठिकाणी पाणी साचले होते. नेरूळ सेक्टर १७ मधील नंदनवन सोसायटीसमोर वृक्ष कोसळला. सेक्टर ४६ मध्ये शॉर्टसर्किट झाले होते. शहरात अनेक रोडवर साचलेले पाणी काढण्यासाठी महानगरपालिकेच्या पथकांची दिवसभर धावपळ सुरू होती.