Rain in Navi Mumbai: सीबीडी नजीकच्या धबधब्याजवळ तरुण, तरुणी अडकलेले; शेतकऱ्यांचीही सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:22 PM2021-07-18T20:22:57+5:302021-07-18T20:24:39+5:30
रविवारी सकाळ पासून नवी मुंबईत पावसाची मुसळधार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणचे मोठे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रहदारी बंद झाली होती.
नवी मुंबई - मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन ठिकाणी नागरिक अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
रविवारी सकाळ पासून नवी मुंबईत पावसाची मुसळधार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणचे मोठे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रहदारी बंद झाली होती. अशाच प्रकारातून तुर्भे एमआयडीसी परिसरातल्या डोंगर पायथ्याशी काहीजण अडकले होते. त्याठिकाणी अडवली भूतवली ग्रामस्थांच्या शेती असल्याने सर्वजण शेतीच्या कामानिमित्त गेले होते. मात्र दुपार नंतर नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचा घराकडे येण्याचा मार्ग धोकादायक बनला होता. याची माहिती मिळताच कोपर खैरने व वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी व तुर्भे एमआयडीसी पोलिसानी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी रस्सीच्या मदतीने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. रात्री 8 वाजेपर्यंत हे मदतकार्य सुरू होते.
तर सीबीडी येथील आर्टिस्ट व्हिलेज परिसरात असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी 10 ते 15 पर्यटक अडकले होते. मानखुर्द परिसरात राहणारे तरुण तरुणी त्याठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र धबधब्याच्या मार्गावरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते त्याच ठिकाणी अडकले होते. याची माहिती मिळताच सीबीडी अग्निशमन दल व सीबीडी पोलीस यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी दोन टोकाला दोरखंड बांधून त्याद्वारे अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.