गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:13 PM2019-07-09T14:13:16+5:302019-07-09T14:22:40+5:30

पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले.

Rain Updates heavy rain panvel and gadhi river overflow | गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू

गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

मयूर तांबडे 

पनवेल - पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी (9 जुलै) सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पोलिसांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

मुसळधार पावसामुळे पनवेलमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. माथेरानच्या डोंगररांगांमध्येही मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीमधील पाण्याची पातळी वाढली आहे. उमरोली गावचा पनवेलशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  येथील निर्मीती गार्डनमध्ये राहणारे आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व त्याची पत्नी सारिका आंब्रे मोटारसायकलवरून  नदीवरील छोटय़ा पुलावरून पनवेलकडे जात होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते मोटारसायकलसह नदीमधून वाहून गेले. नागरिकांनी याविषयी पोलीस व महसूल प्रशासनाला माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12 वाजेपर्येत त्यांचा तपास न लागल्यामुळे खोपोलीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) ला पाचारण करण्यात आले. 

नदीमध्ये वाहून गेलेला आदित्य आंब्रे हा मुळचा रायगड जिल्ह्यातील महाडमधील दहिवड गावातील रहिवासी आहे. नेरूळमध्ये क्रोमा शोरूममध्ये नोकरी करत आहे. डिसेंबर 2018 मध्ये त्याचा सारिकासोबत विवाह झाला होता. सारिकाचे आई-वडील  नेरूळमध्ये राहत आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक घटनास्थळी पोहचले आहेत. 

रखडलेल्या कामामुळे दुर्घटना

उमरोलीमध्ये नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु ठेकेदाराने पावसाळ्यापुर्वी पुलाचे काम पुर्ण केले नाही. यामुळे जुन्या छोट्या पुलावरून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला की छोटा पूल पाण्याखाली जात असून गावचा पनवेलशी संपर्क तुटतो. जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. 

Maharashtra Rain Updates heavy rain in panvel and gadhi river overflow | Maharashtra Rain Updates : उमरोली गावाचा संपर्क तुटला, गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा सोमवारी संपर्क तुटला होता. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. उमरोली गावाला जोडणाऱ्या स्वातंत्रपूर्व काळापासून असलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा पूल यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तयार होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. परिणामी पूल अद्याप अर्धवट स्थितीतच आहे. 

दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने तिथल्या सुमारे 500 कुटुंबांचा संपर्क तुटला. तर नवीन पूल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला पाया देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. तर गावात प्रवेशाचा मार्गच बंद झाल्याने उमरोली गावातील चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. अनेकजण सकाळीच कामानिमित्ताने गावाबाहेर आले असता, ते परत घरी पोहचू शकलेले नाहीत. यामुळे पावसाळ्या पूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही तसे न झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा संताप उमरोली गावातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. 

 

Web Title: Rain Updates heavy rain panvel and gadhi river overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.