शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ४० टन भाजीपाल्याची विक्री नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:08 AM2018-07-04T05:08:31+5:302018-07-04T05:08:42+5:30
मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही. धान्य व फळ मार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये सोमवारी १७३४ वाहनांमधून कृषी माल विक्रीला आला होता. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्यामुळे फक्त १२६० गाड्यांची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५५० वाहनांमधून तब्बल १६४ टन कृषी माल विक्रीसाठी आला होता. नाशिक, पुणे, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला होता. भिजल्यामुळे जवळपास १० टन माल फेकून द्यावा लागला. मुंबईमधून किरकोळ विक्रेते माल खरेदी करण्यासाठी आलेच नाहीत. यामुळे तब्बल २५ टक्के मालाची विक्रीच झालेली नाही. मार्केटमध्ये ४० टनपेक्षा जास्त माल दिवसभर पडून होता. बुधवारी कमी दराने या मालाची विक्री करावी लागण्याची शक्यता आहे. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भाजीपाला मार्केटबरोबर धान्य मार्केटमधील व्यवहारावरही परिणाम झाला आहे. सोमवारी मार्केटमध्ये ४१९ वाहनांची आवक झाली होती. मंगळवारी फक्त २०८ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. मसाला मार्केटमध्येही ५० टक्के आवक कमी झाली आहे. आवक कमी असूनही ग्राहकच नसल्यामुळे कृषी मालाची विक्री होऊ शकली नाही. बाजारभावामध्ये फरक पडला नसला तरी पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.
पावसामुळे मुंबई व उपनगरांमधून किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी पुरेशा प्रमाणात आले नाहीत. यामुळे २५ टक्के मालाची विक्री होऊ शकली नाही.
- शंकर पिंगळे,
व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी
कांदा - बटाटा मार्केटमध्येही आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. सोमवारी २५९ वाहनांची आवक झाली होती. मुसळधार पावसामुळे मंगळवारी फक्त १७४ वाहनांमधून कांदा, बटाटा व लसूणची आवक झाली आहे.
- सुरेश शिंदे,
व्यापारी, कांदा मार्केट