खोपोली : खोपोलीसह खालापूर तालुक्यात बुधवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्यांना मात्र या पावसाने मोठा दिलासा मिळाला. तालुक्यासह खोपोलीत असलेल्या विवाह सोहळ्यावर पावसाचा परिणाम झाल्याचे चित्र पहायला मिळाले, तर अनेक वीटभट्टी व्यावसायिकांचेही पावसाने नुकसान केले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. खालापूर तालुक्यात बुधवारी संध्याकाळी चार नंतर पावसाला सुरु वात झाली. मेघगर्जनेसह वादळीवारा वाहत असल्याने अनेकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. खोपोलीसह तालुक्याच्या अन्य भागातही जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या उन्हाळी पावसाने वीटभट्टी मालकांचे मात्र नुकसान केले आहे . पावसामुळे तालुक्यासह खोपोलीतील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेवून खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरु के ला. मुंबई - पुणे रस्त्यावरील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला होता.
खालापूर तालुक्यात वादळी पाऊस
By admin | Published: May 12, 2016 2:18 AM