मोरबे धरणावर जलवर्षाव, नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली!
By नामदेव भोर | Published: July 25, 2024 06:58 PM2024-07-25T18:58:22+5:302024-07-25T18:58:41+5:30
दहा तासांत १९७ मि.मी. पाऊस : एक दिवसात ८ टक्के पाणीसाठा वाढला
नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावर गुरुवारी जलवर्षाव झाला. सकाळी सात ते सायंकाळी पाच या दहा तासांमध्ये तब्बल १९७ मि. मी. पावसाची नोंद झाली. एका दिवसात पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली असून, या वर्षीही धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली आहे.
या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरणातील पाणीसाठा कमी होत चालला होता. १ जुलैपर्यंत ५६१ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. धरणात ५४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता; परंतु मागील काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस पडू लागला आहे. गुरुवारी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळी सात वाजेपर्यंत धरणात ६६.३८ टक्के धरण भरले होते.
आतापर्यंत एकूण पाऊस २१२२ मि.मी. एवढा झाला होता. धरणाची पातळी ८०.८६ मीटरपर्यंत वाढली होती. सकाळी सात ते सायंकाळी पाच या दहा तासांमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी १९७ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणाची पातळी ७१.२४ मीटरवर पोहोचली. एकूण पाऊस २३१९ मि. मी. झाला आहे. धरणाची पातळी ८१.९९ मीटरपर्यंत वाढली आहे.
मोरबे धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढा साठा धरणात आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस पडला तर या वर्षीही धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी अजून १ हजार मि. मी. पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. यामुळे ऑगस्टमध्ये धरण भरेल अशी अपेक्षा आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी धरण परिसरातील पाऊस व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मोरबे धरण परिसरातील पाणीसाठ्याचा तपशील
प्रकार - १ जुलै - २५ जुलै
दिवसभरातील पाऊस - ५६.२० - १९७
एकूण पाऊस - ५६१ - २३१९
पाणीपातळी - ७०.१६ - ८१.९९
एकूण साठा - ५३.८८ एमसीएम - १३६ एमसीएम
पाणीसाठा टक्केवारी - २८.२२ - ७१.२४
२५ दिवसांत वाढला ४३ टक्के पाणीसाठा
मोरबे धरण परिसरामध्ये जुलैच्या सुरुवातीला फक्त ५४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा होता. आता जवळपास २३० दिवस पुरेल एवढा साठा धरणात उपलब्ध आहे. २५ दिवसांमध्ये तब्बल ४३ टक्के पाणीसाठा वाढला असून तो २८.२२ वरून ७१.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.