नवी मुंबई : ‘ओखी’ चक्रिवादळामुळे सोमवारपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळपासून अनेक भागात रिपरिप पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली, तर शहरातील सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही.मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून महावितरण विभागाच्या वतीने दुपारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांनाही बसला असून, ट्रान्स हार्बर तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. चक्रिवादळाच्या इशाºयामुळे कामानिमित्त मुंबईत जाणाºया नोकरदारवर्गाने मंगळवारी घरी राहणेच पसंत केले. दुपारी ४ वाजल्यानंतर नवी मुंबई परिसरात पावसाने विश्रांती घेतली. आठवडाभरापूर्वी उच्चांक गाठणारा ३५ अंशावरील तापमानाचा पारा २७ अंशावर आला असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. वातावरणात बदल झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात कुठेही नुकसान झालेले नाही.‘ओखी’ वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत शिक्षण उपसंचालक, मुंबई विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली होती. विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत. मंगळवारी नवी मुंबईमधील सर्व खासगी तसेच महापालिका शाळांना बंद ठेवण्यात आल्या होत्या. अचानक सुट्टी जाहीर झाल्याने ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नव्हती, असे विद्यार्थी शाळेबाहेरील फलकावरील सुट्टीची सूचना पाहून परत फिरले. मंगळवारी सकाळी ८.३० ते ५.३० या कालावधीत बेलापूर विभागात १४ मि.मी., नेरुळ विभागात १२ मि.मी., वाशीत १०.५ मि.मी., ऐरोली विभागात १२मि.मी. अशा सरासरी १२.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे ठाणे-बेलापूर तसेच महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली.
‘ओखी’चा वातावरणावर परिणाम, नवी मुंबईसह पनवेल परिसरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:36 AM