पावसामुळे फरसबी, टोमॅटाेचे दर घसरले; ग्राहकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 12:48 PM2022-07-07T12:48:11+5:302022-07-07T12:48:22+5:30
१० टक्के भाजीपाला खराब, बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास ६०० ट्रक, टेम्पोमधून जवळपास ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती.
नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यापारावर झाला आहे. बाजार समितीमधील आवक कमी झाली असून ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे फरसबी, गवार, टोमॅटाेसह इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. तर पावसामुळे १० ते १५ टक्के भाजीपाला खराब झाल्याने फेकून द्यावा लागला आहे.
बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास ६०० ट्रक, टेम्पोमधून जवळपास ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती. यामध्ये साडेपाच लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. बुधवारी पावसामुळे फक्त ५२० वाहनांची आवक झाली आहे. फक्त २५८४ टन मालाची आवक झाली असून त्यामध्ये ३ लाख ६५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पावसामुळे रोडवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. यामुळे ते भाजीपाला खरेदीसाठी मार्केटमध्ये आलेच नाहीत, परिणामी बाजारभाव घसरले.
पावसामुळे आवक कमी झाली आहे. ग्राहकांची संख्याही कमी झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. तसेच टोमॅटो व इतर काही कृषी माल १० ते १५ टक्के खराब झाला आहे. - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट
बाजार समितीमध्ये पुणे, सातारा, नाशिक व इतर जिल्ह्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सद्यस्थितीमध्ये फरसबी, गवार, काकडी, कारली, कोबी व इतर वस्तूंचे दर घसरले आहेत. गाजर, कोबी, टोमॅटो, भेंडी यांची आवक जास्त झाली आहे.