रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे पनवेलकरांचे होत आहे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:00 AM2018-05-09T07:00:50+5:302018-05-09T07:00:50+5:30
पावसाचे छतावर पडणारे पाणी जिरविण्यात बांधकाम व्यावसायिक फाटा देत आहेत. छतावरील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्यामुळे वाहून जाते. शासनाने पावसाचे पाणी जिरविण्यात प्रभावी भूमिका घेतली असली तरी पावसाचे छतावरील पाणी नागरिकांनी कसे जिरवावे याची जागृती करण्यात यंत्रणा कमी पडत आहे.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पावसाचे छतावर पडणारे पाणी जिरविण्यात बांधकाम व्यावसायिक फाटा देत आहेत. छतावरील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्यामुळे वाहून जाते. शासनाने पावसाचे पाणी जिरविण्यात प्रभावी भूमिका घेतली असली तरी पावसाचे छतावरील पाणी नागरिकांनी कसे जिरवावे याची जागृती करण्यात यंत्रणा कमी पडत आहे. सध्या पनवेल शहर आणि सिडको वसाहतीत नवीन इमारतींच्या बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा राबविण्यास टाळाटाळ केली जात आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. एमजेपी, एमआयडीसी ,नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी घेवून पनवेल मनपा आणि सिडको नागरिकांना पाणीपुरवठा करते. परंतु आता कडक उन्हाळा आहे. म्हणून पाणी कमी पडू लागले आहे. त्यातच टाटा पॉवर कंपनी वीजनिर्मिती केंद्र सुटीच्या दिवशी बंद असते. म्हणून पाताळगंगा नदीच्या पात्रात पाणी येत नाही. एमजेपीच्या वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले असल्याने वारंवार शटडाऊन घेतला जातो. देहरंग धरण आटले म्हणून पाणी मिळत नाही. सत्ताधारी विरोधक आणि प्रशासन आपल्या पध्दतीने वेगवेगळ्या यंत्रणांकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत.छतावर पडणारे पावसाचे पाणी जिरविण्याची यंत्रणा निर्माण केली जात नाही किंवा याचाही आढावा प्रशासनातर्फे घेतला जात नाही. इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा हवी. त्याचा फायदा थेट इमारतीतील रहिवाशांना होतो. मात्र पनवेल,सिडको वसाहती तसेच समाविष्ट गावांमध्ये ज्या नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत किंवा आता काम सुरू आहे तिथेही ही व्यवस्था बसविण्याकरिता उदासीनता दिसून येते. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यातून खाडीला जाते. त्याचा काहीही उपयोग होत नाही. पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय चांगला पर्याय असल्याचे मत या क्षेत्रातील अभ्यासक विजय काळे यांनी व्यक्त केले. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे घराच्या छतावर पावसाळ्यात पडणारे पाणी पाइपाद्वारे टाकीत सोडता येते किंवा बोअरवेल आणि विहिरीत सोडून पाण्याची पातळी वाढवता येते, असेही ते म्हणाले.
घरबांधकामातच आहे सिस्टीमचा समावेश
शहरात घराचे बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम आराखड्याची परवानगी घ्यावी लागते. नियमानुसार बांधकामाला परवानगी देण्यात येते. या आराखड्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा समावेश केला आहे. त्याशिवाय आराखड्याला परवानगी दिली जात नाही; परंतु त्याची पाहणी कुणीही करीत नसल्याची खंत अमोल शितोळे यांनी व्यक्त केली आहे.
जुन्या इमारतींनाही जोडता येणे शक्य
जुन्या शासकीय इमारतींचे पाइप शोषखड्ड्यात सोडून पाणी जिरविण्याची यंत्रणा सक्षम करता येणे शक्य आहे. पंचायत समिती, प्रांत कार्यालय , बांधकाम कार्यालय, महसूल प्रबोधनी, शासकीय वसाहतीत, पोलीस ठाणे येथेही यंत्रणा निर्माण करता येईल; परंतु इतर कारणांसाठी निधी खर्च करणारी ही कार्यालये रेन वॉटर हार्वेस्टिंगवर मात्र खर्च करताना दिसत नाही. तसेच महापालिका क्षेत्रातील जुन्या निवासी इमारतींना सुध्दा लावले जावू शकते. परंतु सोसायटीधारकांकडून उदासीनता दिसून येते.
शासनांच्या आदेशानुसार इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे.त्यानुसार आम्ही बांधकाम परवानगी देताना तपासणी करतो. जर ही व्यवस्था असेल तरच भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. मात्र सोसायट्यांकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात उदासीनता दिसून येते.याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
- संजय कटेकर,
शहर अभियंता,
पनवेल महानगरपालिका