- योगेश पिंगळे, वैभव गायकरनवी मुंबई, पनवेल : हरित लवादाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात नवीन बांधकाम परवाने देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग (जलपुनर्भरण) बंधनकारक केले आहे. नियमाची अंमलबजावणी केल्यानंतरच प्रशासनाकडून भोगवटा प्रमाणपत्र दिले जात आहे; परंतु प्रत्यक्षात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा काहीही उपयोग केला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. रहिवाशांमध्येही या विषयी उदासीनता असून, तपासण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही.राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व प्रमुख शहरे पाण्याखाली गेली आहेत. सद्यस्थितीमध्ये जलमय झालेल्या यातील काही शहरांमध्ये जानेवारीनंतरच पाणीटंचाई सुरू होत असून यामध्ये पनवेलचाही समावेश आहे. शहरांमधील पाणीटंचाईची समस्या कमी व्हावी, यासाठीच शासनाने नवीन बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. नगररचना विभागाच्या वतीने ३०० चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे का, हे तपासून घेतले जाते. ज्यांनी ही यंत्रणा निर्माण केली आहे त्यांनाच परवानगी दिली जात आहे. या नियमांची कागदावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे; परंतु भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्षात रेनवॉटर हार्वेस्टिंग होतच नाही. इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी पावसाळी गटारांमध्ये सोडून दिले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २००८ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. विकासकांकडून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते; पण नंतर ती सुरू आहे का हे तपासण्यासाठी काहीही सुविधा नाही, यामुळे प्रत्यक्ष प्रभावी अंमलबजावणी होत नाही.पनवेल महानगरपालिकेत सध्याच्या घडीला पनवेल शहर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आदीसह २९ महसुली गावांचा समावेश आहे. येथील विकास प्राधिकरणाची जबाबदारी पालिकेची आहे तर पालिकेतच समाविष्ट असलेले खारघर, तळोजे, पेंधर, ओवे, नावडे या नोडची नवनगर प्राधिकरण म्हणून सिडको महामंडळाकडे जबाबदारी आहे.सिडको प्रशासनामार्फतही दरवर्षी शेकडो इमारतींना जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग)च्या अटीवर भोगवटा प्रमाणपत्र दिले जातात. मात्र, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही? याबाबत कोणताही पाठपुरावा सिडको अथवा पालिकेच्या माध्यमातून केला जात नाही.पनवेलमध्ये आॅक्टोबर २०१६ पासून २२९ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रपनवेल महानगरपालिकेची स्थापना आॅक्टोबर २०१६ मध्ये झाल्यानंतर जुलै २०१९ पर्यंत २२९ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जलपुनर्भरण च्या अटींवर हे भोगवटा प्रमाणपत्र पालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना दिलेले आहे. या जलपुनर्भरण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला खड्डा (पीट)ची योग्य निगरानी करण्याची लेखी हमी पालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून घेतलेली आहे. मात्र, पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावर अनेक जण या जलपुनर्भरण योजनेअंतर्गत उभारलेल्या यंत्रणेची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. संबंधित (पीट) खड्ड्याला जोडणारे पाइप तुटलेल्या अवस्थेत असतात, अशा वेळी पावसाळ्यात छताचे पाणी या खड्ड्यात जात नाही. संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर पालिकेची जबाबदारी संपलेली असते. अशा वेळी येथील रहिवाशांनीही आपले सामाजिक कर्तव्य लक्षात घेता ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे.असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे पाणी उद्यान व इतर कारणांसाठी वापरता येऊ शकते.तपासणी करून प्रमाणपत्रइमारतीच्या भूभागावर सुमारे आठ फूट खड्डा (पीट) खोदल्यानंतर त्याच्यामध्ये कोळसा, विटा, खडी आदीचे आवरण देऊन या खड्ड्यात येणारे पाणी भूभागात जाईल, अशा प्रकारे हे पीट तयार केले गेलेले असते.इमारतीच्या छतावरून येणारे पावसाचे पाणी पाइपलाइन याद्वारे पीटमध्ये सोडल्याची यंत्रणा कार्यान्वित असल्यावरच पालिकेच्या माध्यमातून भोगवटा प्रमाणपत्र संबंधित सोसायटीला दिले जाते.जल पुनर्भरणाचे हे आहेत फायदेपाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.पनवेल परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रभावी वापर केल्यास उन्हाळ्यात पिण्याव्यतिरिक्त कामासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.नवी मुंबई, पनवेल परिसरातील लोकवस्ती वाढत आहे. भविष्यात पाणीटंचाई अजून वाढणार आहे. यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपाय होऊ शकतो.मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे उदासीनतानवी मुंबई महानगरपालिकेचे स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरवासीयांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. यामुळे पाणीबचतीविषयी उदासीनता वाढत असून रेनवॉटर हार्वेस्टिंगकडेही दुर्लक्ष केले जात आहे.जलपुनर्भरण योजना मनपा क्षेत्रात कार्यान्वित आहे. या संदर्भात सर्व्हे करून व यंत्रणा कार्यान्वित असल्याचे तपासून ३०० चौरस मीटरवरून इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले जात आहे. या संदर्भात रहिवाशांनीही आपले सामाजिक कर्तव्य लक्षात घेता जलपुनर्भरण योजना कार्यान्वित आहे की नाही, याविषयी खात्री करणे आवश्यक आहे.- ए. ए. शेख, सहायक संचालक, नगररचना, पनवेल महानगरपालिका
रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना कागदावरच; अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:11 AM