भर पावसातही कामोठेवासीयांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:01 PM2019-07-07T23:01:14+5:302019-07-07T23:01:18+5:30

पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण : मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याचा परिणाम

In the rainy season, the grasshoppers are dry in the rainy season | भर पावसातही कामोठेवासीयांच्या घशाला कोरड

भर पावसातही कामोठेवासीयांच्या घशाला कोरड

Next

कळंबोली : कामोठे वसाहतीत मागणीच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कामोठेवासीयांना भर पावसातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सिडकोकडून पुरवल्या जाणाऱ्या टँकरमधून दूषित पाणी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडकोच्या पाणी वितरणातील ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत असून याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.


कामोठे नोडमध्ये सिडकोने ३६ सेक्टर विकसित केले आहे. वसाहतीची लोकसंख्या दोन लाखांच्या वर आहे. वसाहतीला नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातील पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी दिले जाते. कामोठेकरांना ४२ एमएलडीची मागणी आहे, तर ३० ते ३२ एमएलडीच पाणीपुरवठा केला जात आहे. जवळपास १० एमएलडी पाण्याची तूट आहे. त्यामुळे सिडको मिळालेल्या बत्तीस एमएलडीतच सर्व सेक्टरला पाणी वितरण करावे लागते. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने नियोजन सुद्धा केलेले आहे, परंतु त्यात त्रुटी आढळून येत आहेत.
संपूर्ण उन्हाळा कामोठेकरांच्या घशाला कोरड पडली होती. पावसाच्या दिवसात तरी पाणी मुबलक मिळेल, अशी आशा होती, परंतु ही वसाहत तहानलेलीच आहे. इतर ठिकाणची हीच परिस्थिती आहे. कळंबोलीतील नवीन पनवेलमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.


त्याचबरोबर मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्याचे सिटीजन युनिटी फोरम व एकता सामाजिक संस्थेने सिडकोच्या निदर्शनास आणून दिले आहे, तरीही सिडकोचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सद्यस्थितीला वीस मिनिटच पाणी येत असल्याने सोसायट्यांना अतिशय कमी पाणी मिळत आहे. या ठिकाणी सिडकोकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तेही दूषित पाणी येत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे सिडको लक्ष देत नाही. तसेच पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याते मत रहिवासी व्यक्त करत आहेत.
 

कामोठे वसाहतीला मागणीप्रमाणे कमी पाणीपुरवठा होतो ही वस्तुस्थिती आहे. नवी मुंबई महापालिकेकडून पाणी कमी मिळत असल्याने नियोजनात अडचणी निर्माण होत आहेत. टँकरद्वारे सोसायट्यांना पाणी दिले जाते. दूषित पाणीपुरवठा होत असेल तर पाहणी करून लवकरच याबाबत उपाययोजना केल्या जातील.
- गजानन दलाल, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, सिडको

Web Title: In the rainy season, the grasshoppers are dry in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.