नवी मुंबई : भडकावू भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे जामीन घेण्यासाठी शनिवारी वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. या खटल्यात सुनावणीला सुरुवात करण्यासाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर राहून जामीन घेणार आहेत.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात २६ जानेवारी २०१४ ला राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी राज्यभरातील टोल वसुलीबाबत संताप व्यक्त केला होता. या वेळी टोलविरोधात त्यांनी भडकावू भाषण केल्यानंतर सभा संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व साथीदारांवर गुन्हे दाखल करून अटक झाली होती. तर भडकावू भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरदेखील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे २०१८ मध्येदेखील न्यायालयाने त्यांना समन्स काढले होते. मात्र २८ जानेवारीला ते समन्स संपल्याने त्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे प्रत्यक्ष सीबीडी येथील वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. या वेळी वकील राजेंद्र शिरोडकर हेही सोबत असणार आहेत. तर वाशी न्यायालयात ठाकरे यांना जामीन मिळवून देण्यासाठी वकील अक्षय काशीद, नीलेश बागडे व किशोर शिंदे यांची फळी प्रक्रिया हाताळणार आहे. मनसेच्या कायदेतज्ज्ञांची ही फळी सदर खटल्यात न्यायालयात ठाकरे यांची बाजू सांभाळत आहे.
सीवूडला घेणार सभान्यायालयीन प्रक्रिया उरकल्यानंतर मनसेच्या सीवूड येथील कार्यालयाबाहेर राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. या वेळी आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून भाष्य केले जाण्याची उत्सुकता मनसैनिकांनी लागली आहे.