राज ठाकरे यांच्या इनोव्हाचा नंबर बोगस?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:08 AM2019-10-09T01:08:25+5:302019-10-09T01:08:43+5:30
वाहनांच्या नंबरचा हा घोळ नेमका कसा झाला ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इनोव्हा कारचा नंबर बनावट असल्याची बाब उघडकीस आली आहे. सदर नंबर हा खारघर येथील एका व्यक्तीच्या फॉर्च्युनर कारचा आहे. वाहनांच्या नंबरचा हा घोळ नेमका कसा झाला ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकविरा देवीच्या दर्शनानंतर मुंबईला जात असताना त्यांच्या ताफ्यातील इनोव्हा कारचा सानपाडा येथे किरकोळ अपघात झाला. त्या कारमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे बसलेल्या होत्या. त्या इनोव्हा कारचा नंबर एम.एच. ०४ ए.आर. ९ असा होता. प्रत्यक्षात मात्र त्या नंबरची नोंदणी फॉर्च्युनर कारवर झालेली असून ती कार खारघर येथील विजय कळंबे यांची आहे. तर सध्या ती कार महाबळेशवर येथे असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे सदर नंबर हा फॉर्च्युनर वर नोंदवलेला असताना तो राज ठाकरे यांच्या इनोव्हा कारवर कसा असा प्रश्न निर्माण होत आहे.
राज ठाकरे यांच्या इतरही कारचे क्रमांक ९ असल्याने त्यांनी तो ठाणे आरटीओ कार्यालयातून मिळवला असावा अशीही शक्यता आहे. त्यामुळे या आरटीओच्या घोळामुळे हा प्रकार घडला का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत ठाणे आरटीओ अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. परंतु अती महत्वाच्या व्यक्तींच्या वाहन नोंदणी बाबत घडलेला हा प्रकार समोर आल्याने महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्न निर्माण होत आहे.