ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर नाराज असलेल्या २३ भाजपा नगरसेवकांचे मन वळवण्याकरिता झालेल्या बैठकीतील दिलजमाईच्या निर्णयाची शाई वाळण्यापूर्वी या नगरसेवकांनी पुन्हा बंडाचा झेंडा फडकावण्यामागे शेजारील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीचे इच्छुक उमेदवार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेकडून सुरू असलेला विरोध हेच कारण आहे. सेनेने सोमय्या यांना गॅसवर ठेवल्याने भाजपाने विचारे यांना गॅसवर ठेवले. अर्थात, ईशान्य मुंबईतील उमेदवारीवरून सुरू असलेला वाद चिघळला, तर त्याचे पडसाद हे ठाणे व पालघर जिल्ह्णांतील लोकसभा मतदारसंघांत उमटण्याची चिन्हे आहेत.
विचारे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपाच्या २३ नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन खोपट येथील भाजपा पक्ष कार्यालयात समन्वय बैठक घेऊन नगरसेवकांचे आणि विचारे यांचे मनोमिलन घडवून आणले होते. मात्र, त्याचवेळी शेजारील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे इच्छुक उमेदवार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला ‘मातोश्री’वरून कडाडून विरोध सुरू झाला. सोमय्या यांना भेटीची वेळ दिली जावी, याकरिता भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी दोनवेळा मातोश्रीची पायरी चढली. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोमय्या व लाड यांची एक बैठक मुंबईत झाली. त्यानंतर, अचानक ठाण्यातील भाजपाचे थंड झालेले नगरसेवक पुन्हा बंडाचे झेंडे घेऊन उभे राहिले. शुक्रवारी त्यापैकी २१ नगरसेवकांनी मनोमिलन बैठकीला हजर राहिलेल्या नारायण पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. पवार यांनीही पुन्हा आम्ही सर्व नगरसेवक एकत्र असून युतीच्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले. सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध डावलून उमेदवारी दिली, तर आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवू, असा इशारा शिवसेना खा. संजय राऊत यांचे बंधू आ. सुनील राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्या यांना समजा भाजपाने उमेदवारी दिली, तरी शिवसैनिक त्यांना साथ देणार नाहीत, हेच राऊत यांनी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघात आपणच का शिवसेनेला आलिंगन द्यायचे. जर ते सोमय्या यांना पटकणार असतील, तर आपणही विचारे यांना पटकू शकतो, अशा भावनेतून भाजपाच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या संकेतावरून ठाण्यातील भाजपा नगरसेवकांनी मनोमिलनाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे, असे समजते.वादाचे दूरगामी परिणाम होणारसोमय्या यांना शिवसेनेचा विरोध कायम राहिला व त्यामुळे उमेदवार बदलला गेला, तर भाजपा व रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील शिवसेनेवरील राग अधिक घट्ट होईल. ‘चौकीदार चोर है’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे अगोदरच भाजपाचा कार्यकर्ता दुखावला आहे. त्यात सोमय्या यांना उमेदवारी नाकारली गेली, तर त्या नाराजीचा परिणाम ठाणे व पालघर जिल्ह्णांतील लोकसभा निवडणुकीत दिसण्याची दाट शक्यता आहे. सोमय्या यांनीही शिवसेनेवर टीका करताना मर्यादाभंग केला असून थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अगोदर टीका करणारी शिवसेना सत्तेकरिता लाचार होऊन भाजपासोबत गेल्याची टीका सतत होत असून सेनेचा कट्टर मतदार उद्धव यांच्या घूमजावावर फारसा खूश नाही. त्या मतदाराला आपण पूर्णपणे झुकलेलो नाही, हे दाखवून देण्याकरिता सोमय्या यांना उमेदवारी न देण्याकरिता शिवसेना दबाव टाकत आहे. यामुळे सेनेचा मतदार कदाचित सुखावला, तरी भाजपाचा दुखावू शकतो व परस्परांमधील विसंवाद वाढला, तर ठाण्यात भाजपा विचारे यांच्याशी असहकार्य करील, तर भिवंडीत कपिल पाटील यांना सेनेच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. डोंबिवलीतील संघाचे कार्यकर्ते हेही नाराजी व्यक्त करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी ही युतीकरिता ठाण्यात नवी डोकेदुखी झाली आहे.