पनवेल : पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्र मणांवर कारवाई केली होती. यात अपंग व्यावसायिकांच्या टपऱ्याही हटविण्यात आल्या होत्या. याच्या निषेधार्थ अपंगांनी पालिकेवर मोर्चाही काढला होता. हक्काची जागा मिळण्यासाठी अपंगांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती दीपक घाग यांनी दिली.अनधिकृत व्यावसायिकांना हटविण्याच्या मोहिमेदरम्यान पदपथावर बऱ्याच कालावधीपासून व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या अपंग व्यक्तींनाही हटविण्यात आले आहे. त्यामुळे अपंग व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यासाठी अपंग क्रांती सेनेने महापालिकेच्या समोर आंदोलनाचे हत्यार उपसले होते. याबाबत अपंगांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना लक्ष घालण्यास सांगितले. अपंग व्यक्तींना स्वबळावर जीवन जगता यावे, म्हणून शासनाने विविध सवलती व उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे अपंग व्यक्ती पदपथावर व्यवसाय करत असेल, तर त्यांना तेथून हटविण्यापूर्वी इतरत्र पर्यायी जागा देणे आवश्यक आहे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
अपंगांनी दिले राजकुमार बडोलेंना निवेदन
By admin | Published: March 26, 2017 5:14 AM