नवी मुंबई : कोळ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. कोळीवाड्यांमध्ये हा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. कोळ्यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी लहान-मोठ्या होड्या आणि बोटींची जय्यत तयारी करून होड्या सजवण्यात आल्या होत्या. दर्या सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वाशी गावातील डोलकर मच्छीमार मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण भोईर, रोशन भोईर, सूर्यकांत भोईर, विनोद पाटील यांच्यासह नगरसेविका फशीबाई भगत आणि काँग्रेसचे युवानेते निशांत भगत मिरवणुकीत उपस्थित होते.घणसोली गावच्या कोळीवाड्यातील जय मरीआई मित्रमंडळ व महिला मंडळाच्या वतीने स्थानिक नगरसेवक द्वारकानाथ भोईर, निवृत्ती जगताप, घनश्याम मढवी यांच्यासह गावकीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवा कोळीवाडा येथील नवजीवन कला पथकच्या वतीने स्थानिक नगरसेवक चेतन नाईक, माजी नगरसेवक जी. एस. पाटील, सीताराम केणी, चंदन मढवी, यशवंत दिवेकर आणि ऐरोली कोळीवाड्यात चंदू कोळी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने खाडीकिनारी दुपारी १२ वाजल्यापासून भव्यदिव्य सोन्याचा नारळ सागरदेवाला अर्पण करण्यासाठी ऐरोली-मुलुंड पुलाखाली शेकडो कोळी बच्चेकंपनीसह मिरवणुकीत सामील झाले होते.
नवी मुंबईत दिवाळे कोळीवाडा येथील सिद्धी विनायक मित्रमंडळ आणि दिवाळे ग्रामस्थ, सारसोळे कोळीवाड्यातील कोळवाणी मित्रमंडळ आणि एकवीरा युवक मित्रमंडळ, वाशी-बेलापूर, पाम बीच येथील सारसोळे खाडीत नारळीच्या मिरवणुकीत आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. तर नगरसेविका रूपाली भगत, नगरसेवक सूरज पाटील, मनोज मेहेर, राजेश नाखवा, मेघराज जोशी, नीलेश तांडेल, मंगेश मढवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.