अनोखे रक्षाबंधन! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बांधल्या राखी, केलं सुरक्षिततेबाबत प्रबोधन
By कमलाकर कांबळे | Published: August 30, 2023 02:34 PM2023-08-30T14:34:53+5:302023-08-30T14:37:02+5:30
तुर्भे येथील डॉक्टर सी व्ही सामंत विद्यालय आणि एपीएमसी वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र त्यानंतर सुद्धा अनेक जण या नियमाचे पालन करताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन तुर्भे येथील सामंत विद्यालयातील विद्यार्थिनीने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला.
तुर्भे येथील डॉक्टर सी व्ही सामंत विद्यालय आणि एपीएमसी वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. एपीएमसी बाजार पेठेतील मुख्य चौकात सामंत विद्यालयातील आरएसपीच्या विद्यार्थिनींनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना रोखून त्यांना राखी बांधली. तुमच्या घरी तुमची आई, ताई , बायको आणि मुलगी वाट पाहते आहे. त्यामुळे वाहने जपून चालवा, असा संदेश या विद्यार्थिनीने वाहन चालकांना दिला. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख तसेच सामंत विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक हणमंत डुबल. संतोष भोईर, मीनल म्हात्रे. रेश्मा शेडगे आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.