नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 02:30 AM2019-12-22T02:30:39+5:302019-12-22T02:30:58+5:30
वाशी, पनवेलमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग । विविध संघटनांच्या पुढाकाराने आयोजन
नवी मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वाशीत भव्य रॅली काढण्यात आली होती. वाशी रेल्वेस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान निघालेल्या या रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता, तसेच पनवेलमध्येसुद्धा रॅली काढण्यात आली. यावेळी कायदा व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आला.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने होत असतानाच, या कायद्याच्या समर्थनार्थ वाशीत भव्य रॅली काढण्यात आली. भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह शहरातील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार, रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. वाशी रेल्वेस्थानकापासून या रॅलीची सुरवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाअध्यक्ष रामचंद्र घरत, सरचिटणीस सतिश निकम, माजी खासदार संजीव नाईक, कृष्णा पाटील, सी. व्ही. रेड्डी, अजय मुडपे आदी उपस्थित होते. रॅलीदरम्यान कायद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता रॅलीच्या मार्गावर सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या नियंत्रणाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅली पोचल्यानंतर त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली, तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्याचेही आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले. कायदा मंजूर होताच, त्याविषयी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचे मत रॅलीचे आयोजक सतिश निकम यांनी व्यक्त केले. यामुळेच देशभरात हिंसक आंदोलने होत असल्याचीही खंत व्यक्त केली. मात्र, या कायद्यामुळे केवळ अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्यांच्याच अडचणी वाढणार असून, इतरांनी भयभीत होण्याची गरज नसल्याचेही मत निकम यांनी व्यक्त केले.