पोलादपूरची आरोग्य यंत्रणा रामभरोसे
By admin | Published: May 14, 2016 12:59 AM2016-05-14T00:59:36+5:302016-05-14T00:59:36+5:30
दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे.
प्रकाश कदम , पोलादपूर
दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. मात्र तरीही शासन दरबारी रुग्णसेवेबाबत कमालीची अनास्था असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठ उपकेंद्रे आणि एक ग्रामीण रु ग्णालय आहे. परसुले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ नावालाच मंजूर असून समस्यांशिवाय येथे काहीच नाही. कोणत्याही सुविधा नसताना घाईघाईत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वत:ची इमारत नाही. इतकेच नव्हे तर कर्मचारी व अधिकारी वर्गही मंजूर नाही.
उपचारासाठी येणारे रुग्ण सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम २०-२५ वर्षांपूर्वी छोट्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. आजूबाजूच्या ४२ गावांतील सुमारे २२ हजार रु ग्ण येथे उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन उपकेंद्रे आहेत. रुग्ण वाढल्याने ही इमारत कमी पडत आहे. याशिवाय रुग्णांना अनेकदा बाहेरून औषधे खरेदी करावे लागतात. रुग्णांकरिता एक रुग्णवाहिका येथे उपलब्ध आहे. याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असले तरी एक शैक्षणिक रजेवर आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण रु ग्णालय हे केवळ रेफर सेंटर बनले असून प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्याच सुविधा येथे मिळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,रिक्त पदे, सुविधांची वानवा या प्रमुख समस्या असून याबाबत अनेक वेळा तक्र ारी करूनही रुग्णालय प्रशासन सुधारण्यास तयार नाही. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, यंत्रणेशिवाय चाललेल्या रु ग्णालयाची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झाली आहे.
अत्यवस्थ रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार लांबच, नातेवाइकांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना नो एंट्री असा अलिखित नियम या रु ग्णालयात बनला आहे. रुग्णालयातील जबाबदार अधिकारी वर्गाची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे लहान मोठ्या शस्त्रक्रि येबाबत पुढे पाठवले जात असल्याने ग्रामीण रु ग्णालय आहे की रेफर सेंटर असा प्रश्न रु ग्णांना पडतो.
गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी महाड शासकीय रु ग्णालय किंवा मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले जाते. ग्रामीण रु ग्णालयाबरोबरच रु ग्णांची परिस्थिती रामभरोसे आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये ३0 खाटांची क्षमता आहे. येथे ग्रामीण भागातील रु ग्ण येत असतात. शासनाने लाखो रु पये खर्च करून रुग्णालय उभारले. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रु ग्णालय रु ग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे. महत्त्वाची असलेली पदेच रिक्त असल्याने रु ग्ण सेवा विस्कळीत आहे.तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे रु ग्णालय ओपीडीवरच जास्त चालले आहे.रिक्त पदांमुळे रु ग्णांना उपचार मिळत नसल्याने तालुक्यातील नागरिकांत आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड रोष आहे.
गेली चार वर्षे येथे प्रसूतीतज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्व डिलिवरीचे रु ग्ण महाडमध्ये पाठवले जातात. फक्त ओपीडी रु ग्णांसाठी हे रु ग्णालय चालू आहे का,हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कशेडी व आंबेनळी हे दोन घाट पोलादपूरपासून सुरु होतात त्यामुळे ग्रामीण रु ग्णालय सुसज्ज असायला हवे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.