‘राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, एकतेचे प्रतीक उभे राहणार आहे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:34 AM2021-01-16T00:34:11+5:302021-01-16T00:34:26+5:30
राघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन : श्रीराम मंदिर निर्माण अभियान सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : ‘श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्याची वेळ यावी, ही आनंददायी की खेदाची बाब आहे, हे कळत नाही. देशात लाखो मंदिरे उभी आहेत; मग हे मंदिर कशासाठी? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. याबाबत सांगायचे तर श्रीराम आपल्या कणाकणांत आहेत. ईश्वराचे एक मूळ स्थान आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. हा त्याचा गर्भितार्थ आहे. पाचशे वर्षे लागलेला कलंक आपल्याला पुसायचा आहे. यासाठी अनेकांचे बलिदान आहे. राममंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे, संस्काराचे प्रतीक उभे राहणार आहे.' असे स्पष्ट प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी शुक्रवारी येथे केले.
अयोध्येत श्रीरामांचे भव्य असे मंदिर उभे राहत आहे आणि याकरिता सर्व देशभर श्रीराम मंदिर निर्माण अभियान सुरू आहे. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अभियान राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात म्हणून विठ्ठलनगरमधील सावली सोसायटीमध्ये राममंदिर निर्माण संपर्क अभियान कर्जत तालुक्याच्या वतीने संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील अभियान कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे, तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुका संघचालक विनायक चितळे, तालुका अभियानप्रमुख दिनेश रणदिवे व्यासपीठावर उपस्थित होते. जैन श्वेतांबर समाजाच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश आणि सतीश दत्तात्रेय श्रीखंडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.