“महापौर भाजपचाच होणार; महाविकास आघाडी घाबरलीय, नेते कार्यकर्ते बिथरलेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:40 AM2021-12-17T10:40:42+5:302021-12-17T10:40:53+5:30

स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपला घाबरले, अशी टीका करण्यात आली आहे.

ramchandra gharat claims that next mayor of navi mumbai corporation will be from bjp | “महापौर भाजपचाच होणार; महाविकास आघाडी घाबरलीय, नेते कार्यकर्ते बिथरलेत”

“महापौर भाजपचाच होणार; महाविकास आघाडी घाबरलीय, नेते कार्यकर्ते बिथरलेत”

Next

नवी मुंबई: राज्यात आता हळूहळू महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवातही केली आहे. आगामी वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिकेत भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना काही झाले तरी नवी मुंबईत महापौर भाजपचाच होणार आहे. इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपला घाबरले, असा टोला लगावण्यात आला आहे. 

नवी मुंबईचा विकास फक्त भाजपच करू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येणार असून, महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले स्वबळावर लढणार म्हणत होते. आता आघाडीच्या चर्चा सुरु आहेत. भाजपने चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे पानिपत केल्याचे आपण पाहिले आहे, असे ते म्हणाले.

नवी मुंबईत भाजपची ताकद वाढलीय

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बिथरले आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसे लढायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यांचे कार्यकर्ते रोज आमच्याकडे येत आहेत. मंदा म्हात्रे आणि मी लढत होतो. मात्र, आता गणेश नाईक सोबत आल्याने भाजपची ताकद वाढली आहे. भाजपचा महापौर नवी मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. 

दरम्यान, नवी मुंबईत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची सत्ता भाजपकडे आहे. भाजपला धक्का देण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या  बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबईत महापालिकेतील एकूण सदस्य संख्या १११ इतकी आहे. त्यात आता १० जागांची भर पडणार आहे. त्यामुळे हा आकडा १२१ वर जाईल. यापैकी ७५ ते ८० जागा शिवसेना लढवेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस २० ते २५ आणि काँग्रेस १८ ते २२ जागांवर उमेदवार देणार आहेत.

 

Web Title: ramchandra gharat claims that next mayor of navi mumbai corporation will be from bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.