नवी मुंबई: राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, राज्य पातळीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर तो सर्वच ठिकाणी शक्य होणार नसल्याचे म्हटले जात आहे. यातच आता रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत, मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेनेला बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी शिवसेनेच्या कारभारावर निशाणा साधला. तसेच आरपीआयला बीएमसी निवडणुकीत ३५ ते ३६ जागा मिळाल्या पाहिजेत. आमचा यापैकी १८ ते २० जागा निवडून आणायचा प्रयत्न असेल. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवसेनेचे मुंबईच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबई तुंबते, मुंबईची तुंबई करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे. म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
शिवसेनेची बौद्ध समाजावर अन्याय करण्याची भूमिका
अनिल परब यांना पाठिंबा दिला जातो, पण यशवंत जाधव यांना पाठिंबा दिला जात नाही. शिवसेनेची भूमिका बौद्ध समाजावर अन्याय करण्याची आहे. शिवशक्ती भीमशक्तीचा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयोगाला शिवसेनेने मूठमाती देण्याचे काम केले आहे. यशवंत जाधव यांना ४ वेळा स्थायी समिती सभापद दिले. मात्र, बौद्ध असल्यामुळे महापौर पदाची संधी दिली नाही. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. मात्र, तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. बौद्ध समाजाला डावलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून वारंवार झाला आहे. सध्या यशवंत जाधव यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडली, मात्र शिवसेना यशवंत जाधवांची बाजू घ्यायला तयार नाही, असा आरोप रामदास आठवले यांनी यावेळी केला.
दरम्यान, राज्यसभेची सहावी जागा भाजपाची निवडून आली पाहिजे. आमच्याकडे ३२ मते आहेत. आम्हाला केवळ १० मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहावी जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्याने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असे रामदास आठवले म्हणाले.