मधुकर ठाकूर -
उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात नुकतेच "रान महोत्सवाचे"आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये पावसाळी ऋतूमध्ये डोंगर तसेच आसपासच्या परिसरात मिळणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत भरविण्यात आले होते. अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या या भाज्यांमध्ये बाफळी, कोरवा, कुरडू, करडई, कंटोली, इत्यादी भाज्यांचा समावेश होता.
नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांचं संकलन विद्यार्थ्यांनी करून दैनंदिन जीवन, साहित्य आणि पर्यावरण यांचा मेळ साधत एक आदर्श उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी या रानभाज्या विशेष परिश्रम करून जमविल्या होत्या.या रान महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी केले. या चांगल्या उपक्रमाची प्रशंसा करत त्यांनी अशा पद्धतीच्या औषधी गुणधर्म असणाऱ्या भाज्यांचे सेवन करून आपले आरोग्य व स्वास्थ्य चांगले राहील असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर केवळ विशिष्ट ऋतूमध्ये मिळणारे या भाज्यांची लागवड जर केली तर वर्षभर या भाज्या उपलब्ध होतील आणि आपले आरोग्य नेहमीच चांगले राहील असे सांगितले.
हिंदी विभागामार्फत राबविला गेलेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे व त्याला व्यापक स्वरूप दिले गेले पाहिजे मतही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. आर. बी. पाटील, हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. झेलम झेंडे, डॉ. सुजाता पाटील, प्रा. राम गोसावी तसेच हिंदी विभागाचे सर्व विद्यार्थी या महोत्सवासाठी उपस्थित होते.