लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : आंतरराष्ट्रीय महिला दिनचे औचित्य साधून शिलेदार ॲडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी किल्ले रायगडवरील रौद्रभीषण हिरकणी कडा यशस्वी सर केला. या आरोहण मोहिमेचे आयोजन करून शिलेदार संस्थेच्या रणरागिणींनी रायगड किल्ल्यावरील हिरकणी कडा सर करून महिला दिन साजरा केला. यावेळी कर्जत तालुक्यातील दिव्यांग असलेले गिर्यारोहक जनार्धन पानमंद यांचा सहभाग महिलांना प्रेरणादायी असाच ठरला.
महिला दिनाचे औचित्य साधून ॲडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने खास महिलांसाठी रायगड वरील रौद्रभीषण हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन केले होते. किल्ले रायगड हिरकणी कडा सर करून सहभागी महिलांचा सन्मान देणारा आणि आपल्या लेकरासाठी तो अवघड बुरूज उतरून येणाऱ्या हिरकणी यांच्या कर्तृत्वला सलाम करणारा तसेच आदर व्यक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. मोहिमेत काही महिला सदस्या पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाल्या होत्या. मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वन विभागातील शीलाताई बडे याच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या महिला सहभागी झाल्या होत्या. आदिती व आर्या या लहान मुलीही मोहिमेत सहभागी होता. तसेच सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकारी नितीन पवार, रोहित जाधव यांच्यासह ५० महिला, पुरुष सदस्य या मोहिमेत सहभागी होते.
जनार्दन पानमंद यांच्या सहभागाने वाढला उत्साह जन्मापासून एका पायाने दिव्यांग असणारे कर्जतचे जनार्दन पानमंद यांचा मोहिमेतील सहभाग सर्वांचा उत्साह वाढविणारा होता. या मोहिमेचे नेतृत्व शिलेदार संस्थेच्या महिला सदस्या कविता बोटाले, शीतल जाधव, अमिता सलियान आणि सिद्धी कदम या महिलांनी केले तर शिलेदार संस्थेचे प्रमुख गिर्यारोहक सागर विजय नलवडे, विनायक पुरी, प्रदीप मदने, सोपान, शैलेश जाधव, रजनीकांत, प्रीतम यांनी तांत्रिक मदत केली.