रंगात रंगुनी जाऊ, पनवेल शहरासह ग्रामीण भागात उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:17 AM2018-03-03T02:17:12+5:302018-03-03T02:17:12+5:30
सप्तरंगांची उधळण करीत शहरातील तरुणवर्ग, बच्चेकंपनी, तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून धुळवड साजरी केली. शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून धुळवड साजरी केली.
नवी मुंबई : सप्तरंगांची उधळण करीत शहरातील तरुणवर्ग, बच्चेकंपनी, तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून धुळवड साजरी केली. शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून धुळवड साजरी केली. अनेक ठिकाणी जलबचतीची विशेष मोहीम राबविण्यात आली, यामध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग होता. शहरातील ढोल-ताशा पथकांनी कोरडी होळी खेळत एकमेकांना शुभेच्छा देत रंगोत्सव साजरा केला. सण साजरा करताना पर्यावरणाचा ºहास होणार नाही याची काळजी घेत पाण्याचा वापर टाळून नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली.
तरुणांनी टिळा रंगपंचमी ही संकल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंच पोहोचविली. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना दिला जाणारा अनमोल संदेश म्हणजे यंदा होळी साजरी करा, पण फक्त टिळा लावून, यामुळे रंग धुण्यासाठीदेखील पाण्याचा जास्त वापर केला जाणार नाही. अशा संदेशाचे पालन करत शहरातील काही सोसायट्यांमध्ये टिळा रंगपंचमी असा आगळ््यावेगळ््या पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला. इकोफ्रेंडली पद्धतीने होळी साजरी करण्याकडे युवापिढीचा मोठ्या प्रमाणात कल दिसून आला. काही सोसायट्यांमध्ये फुलांची उधळण करत रंगोत्सव साजरा करण्यात आला, तर महिलावर्गाने फुगड्या खेळून एकत्र येऊन एकमेकांवर फुले उधळून फुलांच्या विविध रंगांनी रंगोत्सव साजरा केला. यंदा नैसर्गिक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी असली तरीदेखील रसायनमिश्रित रंगही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. कडाक्याच्या उन्हाने लाही-लाही होत असताना उन्हाची तमा न बाळगता प्रत्येक जण मनसोक्तपणे रंगोत्सवात सहभागी होत होता. यंदा प्रत्येकाने कोरड्या रंगाचीच अधिक उधळण केली आहे.
>पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. तालुक्यातील गावांमध्ये देखील रात्री ढोल - ताशांच्या गजरात पारंपरिकरीत्या होळीचे दहन करण्यात आले. शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली, तर धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली. यामध्ये तरु णाईचा पुढाकार होता. विधिवत पूजन करून पेटवलेल्या होळीभोवती फेर धरणारी लहान मुले, तरु णाईचा जल्लोष असे उत्साही वातावरण चौकाचौकात होते. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या, तर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच श्रीफळ वाहण्यासाठी गर्दी होती. मोलाचे हे क्षण मोबाइलच्या कॅमेºयामध्ये टिपण्यासाठी तरु णाई आघाडीवर होती.
>प्लास्टिकमुक्ती मोहीम फोल
एकीकडे प्लास्टिकमुक्ती मोहीम राबविली जात आहे तर दुसरीकडे मात्र धुळवडीला प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. शहरातील दुकानदार मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री करताना दिसून आले. प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर बंदी असूनही दुकानांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय करण्यात आला असून, प्लास्टिक फुग्यांचा वापर झाला. प्लास्टिकमुक्ती अभियान अपयशी ठरले असून, दुकानदारांवर ठोस कारवाई न केल्याने निर्भयपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.